सांगोला :-वट सावित्रीच्या पौर्णिमेला विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात, ही प्रथा आहे. परंतु सोनंद ता. सांगोला येथील धनंजय नारायण भिंगे या तरुणाने याने जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाच्या झाडाची पूजा करून पत्नीसह फेऱ्या मारून आईचे व गुरूंचे आशीर्वाद घेतले.
सोनंद येथील तरुण धनंजय नारायण भिंगे यांचे घरी सांप्रदायिक वारसा असून त्यांचे वडील नारायण भिंगे हे भजन कीर्तन करतात. धनंजय भिंगे देखील कोणत्या ना कोणत्या कारणाने वारकऱ्यांची व समाजाची सेवा करीत असतात. मंगळावर, १० जून रोजी ‘वटसावित्री पौर्णिमा’ सणाच्या निमित्ताने हिंदू धर्म प्रथे प्रमाणे महिला वडाच्या झाडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करून वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. परंतु चळवळीचा विचार घेऊन ध्येय प्रेरित झालेल्या धनंजय भिंगे यांनी मंगळवारी त्यांची पत्नी राजश्री हिस सोबत घेऊन आई, गुरू इंगळे व इतर महिलांच्या साक्षीने जन्मोजन्मी तुझ्या सारखीच पत्नी मिळो असे म्हणत वडाच्या झाडाची पूजा करून सात फेऱ्या घेतल्या. भिंगे याचा हा प्रकार पाहून उपस्थित महिलाना आश्चर्य तर वाटलेच. परंतु त्याने व्यक्त केलेल्या भावनांचे त्यांनी कौतुक केले.