सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सरकारची पगार घेऊन गोरगरीबांची कामे करत नाही, सारखे टाळाटाळ करतात म्हणून काल मंगळवार दि.17 जून रोजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी एका महसुल सहाय्यक या शासकीय कर्मचार्यांचा गुलाबपुष्प देवून सन्मान करत निषेध केला.
दत्तात्रय सावंत यांनी माहिती अधिकार नियमाखाली सांगोला तालुक्यातील अधिकृत खडी क्रशरचे परवाने व त्या त्या संबंधातील सर्व कागदपत्रांची माहिती मिळणेबाबत मागणी केली होती. परंतू तहसीलदार यांचे आदेशान्वये संबंधीत अधिकार्यांना 14 तारखेला माहिती देण्यास सांगितले होते तरीही संबंधीत महसुल सहाय्यक यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधीत महसुल सहाय्यकाचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
’सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे.तालुक्यात तहसील कार्यालयात मोठा भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. ही धोक्याची घंटा आहे. प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी., असेही मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दत्तात्रय सावंत यांनी केले आहे.