सांगोला महाविद्यालयात विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांचे वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

दि 22 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून प्रमुख दिवानी न्यायाधीश, सांगोला मा. श्री. एस. एम. घुगे हे उपस्थित होते. तर सहदिवाणी न्यायाधीश मा. श्री. एस. एस. साळुंखे व विधिज्ञ संघाचे अध्यक्ष मा. श्री. आर. पी. चव्हाण, सांगोला तालुका उच्च् शिक्षण मंडळाचे सहसचिव मा. साहेबराव ढेकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत संस्था सदस्य मा.ॲड. उदयबापू घोंगडे यांनी केले. आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती मिळावी हा उद्देश असल्याने त्यांनी स्पष्ट केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
यानंतरच्या सत्रात मा.ॲड.ए. एस. पटेल यांनी “आदिवासी दिवस” या विषयावर बोलताना एकूण नऊ टक्के समाज वंचित घटक असून राज्यघटनेत या संदर्भात काय तरतुदी आहेत आणि ३३८ अ मध्ये कशी दुरुस्ती झाली याचे विश्लेषण केले.तसेच “रॅगिंग विरोधी कायदे” या विषयावर ॲड. सौ. आर. आर. केदार यांनी आपले मनोगत मांडताना 1975 पासून रॅगिंग विरोधातील इतिहास सांगितला व रॅगिंग करू नये यावर आपले विचार मांडले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अँटी रॅगिंग कॅम्प्मध्ये सहभागी झाले तर आपल्याला एक व्यक्ती म्हणून जगताना कमी समस्या येतात हेही सांगितले.
त्याचबरोबर “युवा दिवस” या विषयावर ॲड. सौ. एस. वाय. सिरदाळे यांनी विवेकानंदाच्या संदेशाची जाणीव युवकांना करून दिली. शाश्वत विकासासाठी युवक हे ब्रीदवाक्य सार्थ करण्यासाठी आपले मत मांडले.
शेवटच्या सत्रातील अध्यक्ष भाषणात मा. श्री. एस. एम. घुगे यांनी विद्यार्थ्यांना कायदयाची बहुमोल माहिती दिली. कायदेविषयक ज्ञानासोबत आपण आपल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याचा विचार केला पाहिजे यावर आपले विचार मांडले. आपल्या स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाच्या प्रगतीचा ही आपण सुजाणपणे विचार केला पाहिजे तर या पुढील काळात चांगल्या समाजाची मूल्ये वाढीस लागतील यावर आपले मत मांडले. कायदे व न्याय हे समाजाला दिशादर्शक म्हणून काम करतील परंतु प्रत्येकाने आपले स्वातंत्र्य जपताना सामाजिक कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे. यावर अत्यंत सोप्या पद्धतीने मुलांसमोर अनुभवपूर्ण मार्गदर्शन केले.
तसेच सहदिवाणी न्यायाधीश मा. श्री. साळुंखे यांनीही आपण नेमके कोण आहोत यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करावे यासाठी प्रोत्साहन पर मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा. चित्रा जांभळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विशाल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. राम पवार, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा लाभ 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.



