महाराष्ट्र
सावे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा संपन्न.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावे माध्यमिक विद्यालयात काल दिनांक 5/7/ 2025 रोजी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या निमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशभूषेत आले होते. सुरुवातीला विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी केले.
त्यानंतर दिंडी विद्यालयातून गावाकडे विठू नामाच्या जयघोषात हनुमान मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय येथे पोहोचली. तेथे इयत्ता आठवी ,नववी व दहावी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भजन व कीर्तन सुंदररित्या सादर केले तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर रिंगण व फुगडी इत्यादीचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांनी सुंदर सुरामध्ये भजन गायन केले व पंढरपूरच्या विठ्ठल व रुक्मिणीचे महात्म्य विद्यार्थ्यांना सांगितले.
सदर पायी दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या वेशभूषेत कुमारी नम्रता माने आणि रुक्मिणीच्या वेशभूषेत कुमारी साक्षी गावडे या सहभागी झाल्या होत्या .त्यानंतर सदर दिंडी गावातून भजन, कीर्तन करीत सावळेश्वर मंदिर येथे पोहोचली .तेथे टाळ व मृदंगाच्या तालावर सर्व विद्यार्थ्यांनी ताल धरला. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यामध्ये गावातील असंख्य माऊली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी यामध्ये सामील झाली होती. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा तुकाराम, माऊली, माऊलीचा गजर करत विद्यार्थ्यांनी गोल रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच दिंडीतील विठ्ठल रुक्मिणीच्या भूमिकेतील कुमारी नम्रता माने व साक्षी गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कुमारी अंकिता हरिदास स्वामी हिने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी विद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली .त्यानंतर विद्यालयांमध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना विद्यालयातर्फे केळी व बिस्किटे वाटप करण्यात आली .अशा प्रकारे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेला पायी दिंडी सोहळा उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.