ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ताणतणावाचे नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्ली – विजय गोडसे

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला मध्ये एसएससी परीक्षा 2024-25 मध्ये 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या 92 विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी (कोल्हापूर) येथील पोलीस निरीक्षक व सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी विजय गोडसे साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ताणतणावाचे योग्य नियोजन या त्रिसूत्रीवर विद्यार्थ्यांना यशाचे शिखर सहजसाध्य होते. आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपल्या फायद्यासाठी कशा पद्धतीने करता येईल हे स्व-उदाहरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची प्रचंड मोठी ऊर्जा असून या ऊर्जेचा सुयोग्य वापर करून आपणासमोर ठेवलेले मोठे उद्दिष्ट आपण सहजपणे साध्य करू शकतो.
या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभामध्ये राज्य प्रथम विद्यार्थिनी कुमारी तनुजा बालाजी चोपडे हिस हिस रोख रुपये तीन हजार सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प व अभिनंदनपत्र आणि 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख रुपये एक हजार, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प व अभिनंदन पत्र आणि 90 टक्के ते 95 टक्के यादरम्यान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प व अभिनंदन पत्र देत पालकांसह सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
राज्य गुणवत्ता यादीत प्रथम आलेली विद्यार्थीनी कुमारी तनुजा चोपडे व कुमारी ज्ञानेश्वरी जगताप यांनी आपल्या मनोगतात हे यश गुरूंच्या अमूल्य मार्गदर्शनातून आपणास शक्य झाल्याचे नमूद केले.
पालक प्रतिनिधी म्हणून व्यक्त होताना डॉ.महादेव जगताप यांनी शाळेच्या कार्याचा गौरव करत शिक्षकांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने डॉ.अजित नवले व डॉ.सुवर्णा नवले यांच्यावतीने इयत्ता दहावीला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले. आभार पर्यवेक्षक उत्तम सरगर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी केले.यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुरेश मस्तूद व मच्छिंद्र इंगोले, पर्यवेक्षक काकासाहेब नरूटे व प्रदीप धुकटे व्यासपीठावर उपस्थित होते.
गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण घेणाऱ्या अकरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक शिवाजी चौगुले यांच्या वतीने रोख रुपये पाचशे तर विज्ञान विषयामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास मार्गदर्शक शिक्षक सौ.शुभांगी घोंगडे, यतिराज सुरवसे, उत्तम बेहरे व अमोल रणदिवे यांच्याकडून रोख रुपये एक हजार बक्षीस देण्यात आले*



