परिस्थितीची जाणीव असणारा विद्यार्थी यशस्वी होतोच- डॉ. शिवाजीराव ढोबळे

नाझरा (वार्ताहर,):- शालेय जीवनापासून ज्या विद्यार्थ्यांच्या मनात आई-वडील आणि गुरु यांच्या वरती श्रद्धा असते,तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिक्षण घेत असतो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या आवडीनुसार शिक्षणाचं माध्यम निवडून स्वतःला सिद्ध करणारी मुले समाजात आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण न आणता त्याला त्याच्या पद्धतीने शिकू द्या. जे विद्यार्थी परिस्थितीची जाणीव ठेवतात ते विद्यार्थी निश्चितपणे यशस्वी होतातच असे प्रतिपादन डॉ. शिवाजी ढोबळे यांनी केले
नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे,प्रमुख पाहुणे जयंत काका देशपांडे, प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक विनायक पाटील, सेवानिवृत्त पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य माने यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्याबद्दलचा हेतू विशद करत,अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते असे स्पष्ट केले. यावेळी ओम आदिनाथ गुरव, विनायक धनाजी पांढरे,सोहम संजय कुमार सासणे, सृष्टी सदाशिव बाबर, सृष्टी संजीव बाबर, आर्या सुभाष पवार, प्राजू अशोक बाबर,संस्कार संतोष गोडसे व श्वेता अंकुश बाबर या 90% च्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह व अभिनंदन पत्र देऊन पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले. 95% च्या वरती असणाऱ्या ओम गुरव व विनायक पांढरे या दोन विद्यार्थ्यांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रोख एक हजार रुपयाचे पारितोषक देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे दीपक शिंदे,चंद्रशेखर लिगाडे, संभाजी सरगर, दिलावर नदाफ,विनायक पाटील, सोमनाथ सपाटे, मंजुश्री ओतारी, संजय चौधरी व सेवानिवृत्त पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांना प्राचार्य बिभीषण माने यांच्याकडून भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक विनायक पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोडसे दिलीप सरगर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



