सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजचे पर्यवेक्षक दशरथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिकचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे सर, पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे, ज्येष्ठ शिक्षक माणिकराव देशमुख, औदुंबर कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता इंगोले, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चैतन्य फुले यांनी आयुष्यातील गुरूंचे महत्व आधोरेखित केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सायली खडतरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरुंच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे. गुरु पौर्णिमा हा सण आपल्याला गुरु-शिष्य परंपरेची महानता आणि गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून सांगतो. भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण स्थान आहे. “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः” या श्लोकातून गुरुंची महती स्पष्ट होते. गुरु हा केवळ शिक्षक नसतो, तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि दीपस्तंभ असतो. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतो.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले यांनी केले तर आभार प्रसिद्धी प्रमुख किरण पवार यांनी मानले.