शिक्षक व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास पेरला जातो त्यामुळे त्यांना उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्या असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व वक्ते श्री. सुनील जवंजाळ यांनी केले. रविवार दि.१०ऑगस्ट रोजी सिंहगड इंस्टिट्यूट कमलापूर येथे विद्यार्थी विकास फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन मा. श्री. दिपक बंदरे उपस्थित होते तर दै. माणदूत एक्सप्रेसचे संपादक श्री. मोहन मस्के सर, सहायक कृषी अधिकारी श्री. मनोज जाधव, हातीदचे प्र. केंद्रप्रमुख श्री.आनंदा बामणे सर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री. रूपेश जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुढे बोलताना श्री. जवंजाळ सर म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांवर आपली स्वप्ने न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना क्षेत्र निवडू द्या. त्यांच्या पंखाप्रमाणे त्यांना उडू द्या म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला बहर येईल. आजची पिढी खूप हुशार आहे त्यामुळे शिक्षक व पालकांना त्यांना तेवढ्याच ताकदीने ज्ञान देता आले पाहिजे. हे सांगताना त्यांनी आपल्या कवितेच्या व कथेच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व काशीबाई नवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर श्री. तानाजी गेजगे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन श्री. दिपक बंदरे यांनी विद्यार्थ्यांनी आपली ताकद ओळखावी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांची आवड ओळखावी व त्यामधून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावे व उत्तुंग यश मिळवावे असे सांगून अभिरूप परीक्षेचे सांगोला तालुका संयोजक श्री. तानाजी गेजगे यांचे कौतुक केले. यावेळी श्री.मनोज जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांमधून श्री. तानाजी केदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व परीक्षा संयोजकांचे कौतुक केले व परीक्षेबद्दल माहिती दिली.
तद्नंतर गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरावर यश मिळवलेले विद्यार्थी होते यावेळी त्यांचे पालक तसेच तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड इंस्टिट्यूटचे सचिव श्री.संजय नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच सिंहगड कॉलेजचे प्रा. श्री.कैलास माळी,तालुका समन्वयक श्री. तानाजी गेजगे,सौ.रूक्मिणी गेजगे, श्री. संगमेश्वर घोंगडे, श्री. विशाल काळे, कु. पल्लवी थोरात श्री.इक्बाल शेख, श्री. किशोर घोंगडे, श्री.चंद्रशेखर पारसे,श्री.हरिदास मोहिते यांनी परिश्रम घेतले.
बक्षीस वाचन श्री. विशाल काळे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुपमा गुळमिरे यांनी केले.