महाराष्ट्र

उत्कर्ष विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सांगोला (प्रतिनिधी):- उत्कर्ष विद्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा भारत मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या परंपरेनुसार इ.५ वी शिष्यवृत्तीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत १६ वे स्थान पटकावलेली व केंद्रात, शाळेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी मनस्वी मंगेश कुलकर्णी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उत्कर्ष विद्यालयातील पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, झेंडागीत, राज्यगीत यांचे सादरीकरण तबला व पेटीच्या तालावर केले. इ.९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘सर्वांग सुंदर व्यायामाने…’ या गीताच्या चालीवर मनमोहक कवायतीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पैरा स्पेशल फोर्स कमांडो पदी २८ वर्ष सेवा पूर्ण केलेले, १९९९ मध्ये कारगील युद्धात, २००२ मध्ये अक्षरधाम ऑपरेशनमध्ये तसेच भारताने पाकीस्तान विरुद्ध केलेल्या सर्जीकल स्ट्राईक मध्ये सहभागी झालेले माजी सैनिक कॅ. मनोहर लक्ष्मण राऊत यांनी त्यांच्या देशसेवेतील कार्याची माहिती देत देशभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तसेच युरोपियन युनियनकडून दिली जाणारी अत्यंत प्रतिष्ठित अशी पी.एच.डी.साठी मेरी क्युरी फेलोशिप प्राप्त माजी विद्यार्थी ऋषिकेश शिवाजी इंगोले याने शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी सूर्योदय फाउंडेशन तर्फे इ.१० वी व १२ वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सूर्योदय फाउंडेशनचे अविराज बडकस उपस्थित होते.

पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्यांचे सादरीकरण करत सर्व वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले. याप्रसंगी दि.१५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटपाने झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा सर्वगोड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्षा नीलिमाताई कुलकर्णी , कोषाध्यक्षा शालिनीताई कुलकर्णी, शिक्षक व सर्व संस्था पदाधिकारी, बहुसंख्य पालक आवर्जून उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रशांत भोसले, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विश्रांती बनसोडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.

———— ————

दि.१५ ऑगस्टच्या निमित्ताने मला शाळेने बोलावले त्याबद्दल शाळेचा मी आभारी आहे. शाळेमध्ये सर्व डिसिप्लिन खूप चांगले होते. शाळेने खूप चांगले कार्यक्रम केले. मला शाळेचे डिसिप्लिन व कार्यक्रम पाहून चांगले वाटले. सर्व शिक्षक स्टाफ व मुख्याध्यापक स्टाफ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खूप छान.
कॅ.मनोहर लक्ष्मण राऊत, माजी सैनिक

———— ————

मी उत्कर्ष शाळेचा माजी विद्यार्थी सन २०१० मध्ये चौथी पूर्ण केली. आज पंधरा वर्षांनी शाळेवर परत आलो. आजची सुंदर शाळा पाहून वाटलं की आमच्यावेळी अशीच सुंदर शाळा असती तर अजून खूप पुढे गेलो असतो. इथे राबवलेले उपक्रम, संस्कार व शिक्षकांचे कष्ट माझ्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावून गेले. आज मी शास्त्रज्ञ होण्याचा एक टप्पा पूर्ण केला आहे, मागे वळून पाहता शाळेचे संस्कार मला नेहमीच माझ्या मार्गवर ठेवत होते. मी आयुष्यभर उत्कर्ष शाळेचा ऋणी राहीन व शाळेस शक्य तशी मदत करीन.
ऋषीकेश शिवाजी इंगोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button