सांगोला तालुकाराजकीय

तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीसाठी 16 हजार 244 मतदार बजाविणार मतदानांचा अधिकार

सांगोला (प्रतिनिधी: तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 8 हजार 399 पुरुष मतदार व 7 हजार 845 महिला मतदार असून, या निवडणुकीत 16 हजार 244 मतदारांच्या हातात सहा ग्रामपंचायतीचे भवितव्य आहे. सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचपद व 62 जागांसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभेच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन होऊन आपल्या पक्षाचा सरपंच व जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील यासाठी राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली असून या ग्रामपंचायतीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
चिणके ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून सरपंचपद ना.मा.प्र.साठी आरक्षित आहे. 1329 पुरुष मतदार व 1319 स्त्री मतदार असे एकूण 2648 मतदार आहेत. अनकढाळ ग्रामपंचायतीत 9 सदस्य असून सरपंचपद ना.मा.प्र. (महिला) साठी आरक्षित आहे. 885 पुरुष मतदार व 831 स्त्री मतदार असे एकूण 1716 मतदार आहेत. बलवडी ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून सरपंचपद ना.मा.प्र.साठी आरक्षित आहे. 1845 पुरुष मतदार व 1680 स्त्री मतदार असे एकूण 3525 मतदार आहेत. पाचेगाव ग्रामपंचायतीत 9 सदस्य असून सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित आहे. 1020 पुरुष मतदार व 1019 स्त्री मतदार असे एकूण 2039 मतदार आहेत. शिवणे ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून सरपंचपद सर्वसाधारण साठी आरक्षित आहे. 1709 पुरुष मतदार व 1592 स्त्री मतदार असे एकूण 3301 मतदार आहेत. चिंचोली ग्रामपंचायतीत 11 सदस्य असून सरपंचपद सर्वसाधारण साठी आरक्षित आहे. 1611 पुरुष मतदार व 1404 स्त्री मतदार असे एकूण 3015 मतदार आहेत. थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने काही ठिकाणी सर्वसाधारण जागेवर सुद्धा महिलांना संधी मिळू शकते. दुसर्‍यांदा जनतेला थेट सरपंच सरपंच निवडण्याचा अधिकार मिळणार आहे.
ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सांगोला तालुक्यातील मुदत संपणार्‍या चिणके, अनकढाळ, बलवडी, पाचेगाव खुर्द, शिवणे, चिंचोली या सहा ग्रामपंचायतीची निवडणूक 18 डिसेंबरला होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच पक्षातील गावपुढारी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, या मतदारांना मतदानाद्वारे सरपंच निवडण्याची दुसर्‍यांदा संधी मिळणार आहे. या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या आहेत. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीत पहायला मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!