सांगोला तालुकाशैक्षणिक

बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक-प्राचार्य भीमाशंकर पैलवान

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज इ.१२ वी पालक- शिक्षक सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी चांगले करिअर करण्यासाठी स्वतःच्या अंगी चांगले गुण अंगिकारावेत.सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यात विविध क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून त्यांनी त्यांचा शोध घेऊन अभ्यासाचे महत्त्व लक्षात घ्यावे.इ.१२वी बोर्ड परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास,चिकाटी व कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पालक-शिक्षक सभेमध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य गंगाधर घोंगडे,पालक- शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.सुलक्षणी गुळमिरे उपस्थित होते.यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील प्रा.कु.विजया फुले,प्रा.राजेंद्र कुंभार व प्रा.कु.अर्चना कटरे यांनी मनोगते व्यक्त करून उपस्थित पालकांना बोर्ड परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना प्राचार्य पैलवान म्हणाले,पाल्याच्या यशात शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका महत्त्वाची असून पाल्याची क्षमता विचारून घ्यावी. प्रश्नपत्रिकांचा अधिक सराव,सर्व विषयांना समान न्याय, कुटुंबातील सुसंवाद आणि सोशल मीडियाचा कमी वापर करून विद्यार्थ्यांनी पालकांचे व शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले. यावेळी उपस्थित पालकांपैकी ॲड.अयुब पटेल,शिवाजी चौगुले,सौ.रुकसाना शेख,सौ.सुलक्षणी गुळमिरे यांनी मनोगते व्यक्त करून काही उपयुक्त सूचना मांडल्या.
सदर पालक-शिक्षक सभेसाठी सुज्ञ पालक,ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य गंगाधर घोंगडे,सूत्रसंचालन प्रा.सौ.आश्विनी जालगिरे यांनी केले,तर प्रा.विजयकुमार सासणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!