राजकीयमहाराष्ट्र

जानकर – मोहिते पाटलांच्या भेटीनं मोठा ट्विस्ट

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी संपर्क मोहीमही सुरू केलेली आहे. त्यातूनच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची  भेट घेऊन चर्चा केली. माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता मैदान मारण्यासाठी मोहिते पाटलांची साथ जानकरांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

माढ्यात भाजपने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहित पाटील लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपच्या माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज झाल्याची चर्चा आहे. अशातच गुरुवारी (ता. 21) माढ्यातून इच्छुक असलेले महादेव जानकर यांनी पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांची अकलूज येथे भेट घेतली.

जानकर – मोहिते पाटलांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने खासदार रणजीत नाईक निंबाळकरांना  पुन्हा रिंगणात उतरवल्याने मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. अद्याप त्यांनी पत्ता उघडा केला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र प्रचारास सुरुवात केली आहे. त्यातच जानकरांनी मोहिते पाटलांची आता दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. धैर्यशील हे पवारांची भेट घेणार असून, तत्पूर्वीच जानकरांनी मोहिते पाटलांचे घर गाठले. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती नसली तरी माढ्यातील आघाडीच्या उमेदवार ठरण्यापूर्वी झालेल्या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाजपने डावलल्याने इच्छुक धैर्यशील मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात गावभेट दौरे व गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच ते बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांची  शुक्रवारी (ता. २२) भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून महादेव जानकरांनाही पवारांनी ऑफर दिलेली आहे. यावर पुढील बोलणी झाली नसली तर आघाडीकडून जानकर हे माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. एकीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी हालचाली सुरू केल्या असल्या तरी दुसरीकडे महादेव जानकर यांनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!