राजकीय

येणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये लालबावटा डौलाने फडकविण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाची विचार मंथन बैठक संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सर्वसामान्य लोकांची आजही शेतकरी कामगार पक्षावर विश्वास व निष्ठा आहे.  स्व.आबासाहेबांनी सांगोला तालुक्याचा शाश्वत विकास केला आहे. तो सुवर्णअक्षराने लिहावा असा असून तालुक्याचा विकास शेकापने केला आहे हे कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.  सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर स्व. आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाने यशस्वी घौडदौड केली असून  येणार्‍या सर्व निवडणुकीमध्ये शेकापचा लालबावटा डौलाने फडकविण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचार मंथन बैठकीमध्ये केला.
सांगोला तालुक्यातील सरपंच, ग्रा.प.सदस्य व वि.का.सेवा. सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या माध्यमातून संस्था बळकटीकरण करणे यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून विचार मंथन बैठकीचे  काल गुरुवार दि.22 डिसेंबर 2022 रोजी सांगोला येथील पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सहकारी संस्थाचे संचालक, ग्रामपंचायतीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सदस्य यांच्यासह पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नूतन 36 ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार श्री.चंद्रकांतदादा देशमुख व डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा.विठ्ठलराव शिंदे सर, दादासाहेब बाबर, अ‍ॅड.भारत बनकर, अ‍ॅड.नितीन गव्हाणे, अ‍ॅड.मारुती ढाळे, गिरीष गंगथडे, दिपक गोडसे, हणमंत कोळवले, नारायण जगताप, लक्ष्मण माळी, अ‍ॅड.विशालदिप बाबर, शिवाजीराव शिंदे, संजय इंगाले, अमोल खरात, यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते श्री.चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले,  ग्रामीण भागात  आजही शेकापक्षाचे वर्चस्व आहे. येणार्या काळात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरुन सर्वसामान्यांना न्याय देईल. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह तरुण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शेकाप कामकाज करणार आहे. येणार्‍या सर्व निवडणुकीमध्ये स्व.आबासाहेबांच्या आशिवार्दावर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर शेतकरी कामगार पक्ष भरारी घेईल असा विश्वास व्यक्त करत  नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, शेकाप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष असून स्व.आबासाहेब यांनी गेली 50 वर्षे गोरगरीब, दिनदलित, कष्टकर्‍यांचे नेतृत्व केले व  सर्वांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आज सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब लोक शेतकरी कामगार पक्षासोबत खंबीरपणे उभे आहेत. शेकाप  येणार्‍या निवडणुकांमध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपपासातील मतभेद दूर झाले तर शेतकरी कामगार पक्ष अजून बळकट होणार असून येणार्‍या निवडणुकांमध्ये लालबावटा फडकाविण्यासाठी सर्वांना कष्ट घ्यावे लागणार आहेत त्यामुळे आजपासून सर्वांनी जिद्दीने कामाला लागावे असे आवाहन करत  पुरोगामी युवक संघटना, गावकमिट्या, महिला आघाड्या लवकरच कार्यरत होतील असा विश्वास दिला.
यावेळी बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर,अ‍ॅड.सचिन देशमुख, संतोष देवकते, सुनिल चौगुले, नंदकुमार शिंदे,  चिदानंद स्वामी सर, डॉ.प्रभाकर माळी, महेश बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
चिंतन बैठकीमध्ये गावे बलशाही करणे, पुरोगामी संघटनेच्या पुर्नस्थापना, पक्षबांधणीचे काम, गावकमिटया मजबूत करणे, तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, तरुण कार्यकर्त्याना जबाबदार्‍या देणे, यासह कार्यकर्त्यांना सक्रीय करणे, विकास सेवा सोसायट्या सक्षमीकरण करणे, ग्रामपंचायतीचे गावासाठीचे महत्व, पक्षवाढीवासाठी पक्ष याविषयावर चर्चा करण्यात  आली. प्रास्ताविक गिरीषभाई गंगथडे,  सूत्रसंचालन  दिपक गोडसे यांनी केले.

 

माझे व अनिकेतचे कान पकडण्याचा अधिकार सर्वसामान्यांना- डॉ.बाबासाहेब देशमुख
माझ्याकडून किंवा अनिकेतकडून पक्षाचे काम करत असताना काही चुका झाल्या तर आमचे कान पकडण्याच्या अधिकार तुम्हा सर्वांना आहे. त्यामुळे आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्हा दोघां बंधूना मोठ्या हक्काने त्याचवेळी सांगाव्यात त्या चुका आम्ही लगेच दुरुस्त करु, असे सांगताच देशमुख परिवाराच्या या साधेपणाचे पुन्हा एकदा दर्शन झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!