‘चला जाणूया नदीला’ माणगंगा, कोरडा जनसंवाद यात्रा

सांगोला – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाऊया नदीला’ हे अभियान सुरू करण्यात येणार असून सोमवार दि. २६ डिसेंबर पासून माणगंगा व कोरडा नद्या अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने नदीकाठच्या गावातून नदी संवाद यात्रा सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील खवासपूर गावापासून नदी यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तालुक्यातील २५ गावात दि. ३० डिसेंबर पर्यंत या संवाद यात्रेचा कार्यकाळ राहणार आहे. यामध्ये माण व कोरडा नदीच्या विकासासाठी प्रत्येक गावात नदीचे कोणते काम करावे लागणार आहे. याबाबत गावकऱ्यांच्या भूमिका समजून घेतल्या जाणार आहेत. व तशा प्रकारचे अहवाल तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहेत. तसेच संवाद यात्रेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी अशा विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये नद्याविषयी आदरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेत महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग इ. सह गावचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, स्थानिक संस्थांचे सदस्य, नदी समन्वयक व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती माणगंगा समन्वयक वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.