संस्कारातून सहकार रुजवणारा सूर्योदय परिवार सर्वांसाठी प्रेरणादायी… इंद्रजीत भालेराव 

       सूर्योदय फाउंडेशनचा सन्मान गुरुजनांचा कार्यक्रम दिमाखात संपन्न

महाराष्ट्राचे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी संस्कारांची जपणूक करत रुजलेला सहकार हा लोकहिताचा ठरतो ही भूमिका प्रथम मांडली. तोच वारसा जपत या सूर्योदय परिवाराने अनेक संस्कारशील गोष्टींचा अवलंब करत घेतलेला सहकाराचा वसा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांनी काढले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मी जवळपास 500 कविता लिहिल्या असून या माझ्या शेतकरी बापांसाठी सूर्योदय परिवाराच्या अनिलभाऊ इंगवले यांनी एल के पी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन सारख्या संस्था उभारून तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला चीलिंग प्लांट च्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देऊन मोठा न्याय दिला आहे. मी आज सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतनला  भेट दिल्यानंतर या तरुणांच्या कर्तृत्वाची उंची लक्षात आली. असेही त्यांनी बोलताना यावेळी सांगितले. ‘ बाप ‘ व ‘ दोस्त’ यासारख्या अनेक कविता सादर करत त्यांनी सुमारे तासभर उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी मंचावर  निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकरराव जाधव, राज्य कर उपायुक्त महादेव लवटे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, नगरचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, नगररचनाकार विठ्ठल धायगुडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे  कक्ष अधिकारी सुमित शिंदे, उपशिक्षणाधिकारी मयूर लाडे, अकोला पशुवैद्यक संस्थेचे सहा. प्राध्यापक डॉ.महेश इंगवले , दुय्यम निबंधक विनायक सोनलकर, परीविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. विक्रम शिंदे, डॉ विनोद थोरात, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, एल के पी मल्टीस्टेटचे व्हॉ. चेअरमन सुभाष दिघे गुरुजी, प्रगती पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये सूर्योदय फाउंडेशनचे अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांनी विविध वचनांचा वापर करत शिक्षक दिन समारंभाच्या निमित्ताने गुरुजनांचे महात्म्य विशद केले. तसेच एलकेपी मल्टीस्टेट व सूर्योदय अर्बन या संस्थांच्या विविध योजनांबद्दल आणि सूर्योदयच्या एकूण वाटचालीबद्दल माहिती सांगितली. यावेळी निवृत्त जिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते, डॉ विनोद थोरात, जीवनगौरव पुरस्कार प्राप्त प्रबुद्धचंद्र झपके सर, डॉ. स्वप्निल मोरे, विश्वास पाटील व सुहास कुलकर्णी इत्यादी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये गुरुजनांचा सन्मान सोहळा आणि सूर्योदय परिवाराची विविध क्षेत्रातील वाटचाल व प्रगती याबद्दल विशेष कौतुक केले. सूर्योदय अर्बनचे चेअरमन जगन्नाथ भगत यांनी यावेळी बोलताना विविध दाखले देत सूर्योदयाच्या अनेक उपक्रमांविषयी माहिती सांगितली.
प्राथमिक , माध्यमिक, ज्यूनियर व सिनियर कॉलेज, उच्चतंत्र शिक्षण कॉलेज, आश्रमशाळा, सेवानिवृत्त शिक्षक अशा विविध स्तरांवरती ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांची खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असूनही संयोजकांचे आखीव रेखीव नियोजन, पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तींसह सर्वच मान्यवरांचे उत्साहात स्वागत, योग्य बैठक व्यवस्था, क्रमाक्रमाने पुरस्कार वितरण , सर्व उपस्थितांची स्टाफ कडून व्यक्तिगत देखभाल, स्नेहभोजनाची सोय यामुळे सूर्योदय फाउंडेशन ने आयोजित केलेला ‘ सन्मान गुरुजनांचा ‘हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बनचा सर्व स्टाफ, एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय दूध विभाग व सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतनचे कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button