अवैध वाळू तस्करी थांबता थांबेना; उदासीन प्रशासनाबाबत शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

सांगोला ( प्रतिनिधी):- सांगोला हद्दीतील माण नदी जवळील जांगळेवस्ती, माळी वस्ती, पवार वस्ती या भागातील नदी पात्रातून वाळू माफियाकडून रात्रंदिवस अवैध वाळु चोरी करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे याबाबत तहसीलदार,तलाठी व सर्कल यांना वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देवूनही अवैध वाळू तस्करी थांबता थांबेना यास जबाबदार कोण असा सवाल या भागातील शेतकऱ्यातून केला जात आहे.
सांगोला शहर व तालुक्यात वरदायिनी ठरणाऱ्या माण,अफ्रूका,बेलवण तसेच ओढ्यातून दररोज हजारो ब्रास चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे महसूल प्रशासन व पोलीस या अवैध चोरट्या वाहतुकीस प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते आहे सांगोला शहरा नाजिक माण नदी जवळील जांगळेवस्ती, माळी वस्ती, पवार वस्ती या भागातील नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू राजरोसपणे ओढली जात असल्याबद्दल या भागातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा लेखी निवेदने सांगोला तहसीलदार अभिजीत पाटील व पोलिस अधिकारी यांना दिली आहेत तरीही अवैध वाळू तस्करावर कोणतीही कारवाई केली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जांगळेवस्ती, माळी वस्ती, पवार वस्ती या भागातील शेतकऱ्यांच्या पाठवडीची हजारो ब्रास वाळू तस्करांनी चोरून नेली आहे. वाळू चोरी बाबत संबंधित तलाठी ,सर्कल , तहसीलदार व प्रांताधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही याची दखल घेतली जात नाही त्यामुळे महसूल प्रशासन, पोलिस खाते व वाळू तस्कर यांचे लागेबांधे असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून वाळु तस्करांवर कारवाई होणे अपेक्षित आहे पण ती होताना दिसून येत नाही शेतकऱ्यांनी वाळू तस्कराना विरोध केला असता वाळू माफियाकडून संबंधित शेतकऱ्यांना दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात तस्कर ट्रॅक्टर, पिकअप, टिपर यासारखी वाहने सुसाट पणे हाकतात त्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले असल्याची नोंद आहे दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकयांच्या विहिरीसुध्दा बेसुमार वाळु उपसामुळे कोरडया पडल्या होत्या सुदैवाने गेल्या दोन वर्षात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने नदीपत्रात व बंधाऱ्यात पाणी टिकून असेल तरी वेळप्रसंगी वाळू तस्कराकडून तस्करी करण्यासाठी बंधाऱ्याचे दरवाजेही काढून टाकले आहेत याबाबत प्रशासनाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फक्त गुन्हे दाखल करून कागदी घोडे नाचविले जातात नदीकाठचा शेतकरी वर्ग अवैध वाळू वाहतुकीस विरोध करीत असताना वाळू तस्कर मात्र संबंधित शेतकऱ्यांना बघून घेण्याच्या धमक्या देत आहेत याबाबत शेतकऱ्यांनी महसूल व पोलीस प्रशासनास निवेदन दिले असून वाळू तस्करावर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्याच्या पाठवडीची वाळू गायब झाल्यास महसूल प्रशासनाकडून सबंधित शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचा महसूल बुडवल्याबाबत बोजा चढवण्याची कारवाई होते परंतु शेतकऱ्यांनी वाळू तस्करी होत असल्याबाबत निवेदन देवूनही प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.