पानिपत शौर्यदिनी महिपतराव बाबर आणि लिंबाजी बाबर यांना डोंगरगाव येथे अभिवादन

छ. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करताना बाबर या समाजाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. पानिपतच्या युद्धात महिपतराव बाबर व त्यांचे बंधू लिंबाजी बाबर यांनी अतुलनीय शौर्य दाखवले पानिपतच्या पराभवानंतर तब्बल २० वर्षांनी सेनापती गोविंदराव बाबर यांनी अब्दालीचा सहकारी नजीब खान रोहिला याला धडा शिकवला. बाबरांनी अटकेपार आपल्या पराक्रमाचा झेंडा फडकवून स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सिद्धगोंडा पाटील यांनी केले.
शनिवार दि १४ रोजी पानिपत शौर्यदिनी पानिपतच्या युद्धात वीरमरण आलेल्या महिपतराव बाबर आणि त्यांचे बंधू लिंबाजी बाबर यांच्या डोंगरगाव ता. सांगोला येथील स्मारकाला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी जगदीश बाबर,ॲड. विशालदीप बाबर, संजय बाबर, बाळासाहेब सावंत, संजय काळे, सरपंच उषा पवार, युवराज बाबर, विठ्ठल बाबर, सयाजी बाबर, विजय बाबर, अण्णासाहेब बाबर, जगन्नाथ बाबर, मुख्याध्यापक उतळे गुरुजी व सहकारी राजकुमार बाबर, शरद बाबर, केशव बाबर, प्रताप बाबर, महेश बाबर, विशाल बाबर आदीसह महात्मा फुले विद्यालय डोंगरगावचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना सिद्धगोंडा पाटील म्हणाले, डोंगरगाव आणि परिसरातील हजारो स्वराज्यनिष्ठ सैनिक महीपतराव बाबर आणि लिंबाजी बाबर यांच्यासोबत पानिपतच्या युद्धासाठी गेले होते. यातील दोन्ही बाबर बंधू आणि शेकडो सैन्य दुर्दैवाने या लढाईत मरण पावले. बाबर समाजाचा इतिहास दुर्लक्षित असला तरी तो खुप प्रेरणादायी आहे. इतिहासकार गोपाळराव जाधव आणि प्रवीण भोसले यांनी या समाजाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र समाजातील तरुणांनी पुढे येऊन आपला ज्वलंत इतिहास सर्वासमोर आणावा असे आवाहनही शेवटी पाटील यांनी केले.
राज्यातील संपूर्ण समाजाची बाबर परिषद भरवणार…!
छ शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा आकाशात डौलाने फडकावा म्हणून अनेक पराक्रमी मावळ्यांनी आपले रक्त सांडले आहे. त्यामधे महीपतराव बाबर, लिंबाजी बाबर, सेनापती गोविंदराव बाबर व गंगाजी बाबर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. बाबर समाजाने स्वराज्यासाठी केलेले कार्य समोर आणून लवकरच राज्यातील संपूर्ण समाजाची बाबर परिषद डोंगरगाव ता सांगोला येथे भरवणार ;
जगदीश बाबर, सांगोला