शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे होऊन संबंधितांना तातडीने मदत मिळावी.- डॉ.बाबासाहेब देशमुख
मेडशिंगी, आलेगाव, वाणीचिंचाळे येथील नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांची भेट

सांगोला(प्रतिनिधी):-अवकाळी पाऊस, वीज, गारपीट, आदी नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे, शेती, फळबागांचे आणि स्थावर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली.
एकीकडे लोकसभा निवडणुक उत्साह असताना दुसरीकडे सांगोला तालुक्यातील विविध भागांमध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह, वादळी वारे व पाऊस झाला.मेडशिंगी, आलेगाव, वाणीचिंचाळे या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली.
सध्या बाजारपेठेत कोणत्याच मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी असंतोष व्यक्त करत असून तीव्र नाराज आहे. मुला मुलींची लग्न, शिक्षण, दवाखाने व दैनंदिन खर्चाने शेतकरी प्रपंच चालवताना मेटाकुटीला आलेला आहे त्यातच पुन्हा या वादळी वारे आणि पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघ्या 15 दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने नेते प्रचाराच्या कामात व्यस्त असताना सांगोला तालुक्यातील शेतकरी मात्र अस्मानी संकटाने हतबल झाला आहे. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी क्षणाचीही विलंब न करता नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या भेटी देवून दिलासा दिला. तसेच नुकसान झालेल्या शेतकर्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विंनतीही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे.
अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे होऊन संबंधितांना तातडीने मदत मिळावी.
डॉ.बाबासाहेब देशमुख