पौष्टिक तृणधान्य खाद्यपदार्थांचे पाककला स्पर्धा व प्रदर्शन सांगोला कृषी विभाग ,उमेद अभियान व कृषि विज्ञान केंद्र यांचे वतीने सांगोला येथे संपन्न

पौष्टिक तृणधान्या पासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धाच्या माध्यमातून मानवी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग, उमेद अभियान व कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा व प्रदर्शन तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व ह्या कार्यशाळा चे पंचायत समिती बचत भवन सांगोला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्या ला अनन्यसाधारण महत्त्व असून संतुलित व परिपूर्ण आहारासाठी तृणधान्य, भरड धान्य व त्याचबरोबर कडधान्याचाही समावेश असावा. कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या महिला भगिनींनी सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आरोग्य संपन्न व सशक्त कुटुंबासाठी झटणाऱ्या महिला या खऱ्या अन्नपूर्णाच होत असे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. नेहा साळुंखे यांनी मत व्यक्त केले.
या प्रदर्शनासाठी सांगोला तालुक्यातील कडलास, एखतपुर, महुद, कोळा, जवळा, नाझरे आदी ग्रामीण तसेच शहरातून मोठ्या संख्येने महिलांनी विविध पौष्टिक तृणधान्य खाद्यपदार्थाचे 45 ते 50 स्टॉल उभारून सहभाग नोंदवला होता. पाककला स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नेहा साळुंखे पाटील मा. श्री सर्जेराव तळेकर उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर ,मा.श्री अभिजीत पाटील तहसीलदार सांगोला ,श्री .तानाजी वळकुंडे कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र मोहोळ ,तालुका कृषि अधिकारी शिवाजी शिंदे , कृणाल पाटिल उमेद आभियान आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
या पाक कला स्पर्धेमध्ये बाजरी पासून बाजरी डोसा उत्तप्पा ,बाजरी उंडे बाजरीचे सांडगे ,बाजरी आप्पे, बाजरीची खीर तसेच ज्वारीपासून ज्वारी चकली ,ज्वारी ढोकळा, ज्वारीचे धिरडे ,ज्वारी धपाटे, ज्वारी पराठा नाचणीपासून नाचणी पापड ,नाचणी सूप, नाचणी फालुदा, भगरीपासून कटलेट, भगरी मसाला भात ,भगरीचे लाडू ,वरी पासून इडली ,राजगिरा चकली, राजगिरा लाडू ,कर्नाटक भागातील प्रसिद्ध रागी मुद्धी तर नाचणी, राळा ,वरई ,बाजरी व ज्वारीच्या पिठापासून पंचरत्न लाडू अशा विविध प्रकारच्या पाककलाकृतींचे दर्शन प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना झाले.
या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात श्री शिवाजी शिंदे तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षांतर्गत समाविष्ट विविध कार्यक्रमाची माहिती सांगून या पाक कला स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया च्या द्वारे गृह उद्योग उभारण्याच्या आवाहन केले .तसेच कृषी विज्ञान केंद्र मोहोळ चे अन्नशास्त्र व तंत्रज्ञ श्री. दिनेश क्षिरसागर यांनी भरड धान्य वर्गातील समाष्टी विविध पिके त्यांची ओळख, वाण ,वैशिष्ट्य ,लागवड पद्धती आदि विषयी माहिती दिली
पौष्टीक तृणधान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी अशा पद्धतीने पाक कला स्पर्धा, प्रदर्शने ,शालेय विद्यार्थ्यांची रॅली तसेच मेळाव्याद्वारे प्रबोधन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्री सर्जेराव तळेकर विभागीय कृषी अधिकारी पंढरपूर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री कुणाल पाटील तालुका समन्वयक उमेद अभियान ,डॉ .वैरागकर कृषी विस्तार विषय विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र मोहोळ तसेच कृषी अधिकारी .कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक त्याचप्रमाणे शेतकरी व महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्रीधर शेजवळ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कुणाल पाटील यांनी मानले.