महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय खंडागळे; सचिवपदी मिनाज खतीब, कार्याध्यक्ष आनंद दौंडे तर उपाध्यक्षपदी गुलाम तांबोळी यांची निवड

सांगोला : तालुका प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रम राबवून गेली तीन ते चार वर्षात सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या आणि पत्रकारितेतून निर्भीड पणे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय खंडागळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेचे मावळते अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मोहन मस्के यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नूतन कार्यकारणीची निवड करण्यासंदर्भात दैनिक मानदूत एक्सप्रेस कार्यालयात मोहन मस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल देशपांडे राजेंद्र यादव अशोक बनसोडे संजय बाबर दिलीप घुले दत्तात्रय खंडागळे मिनाज खतीब दीपक भाकरे प्रवीण घोंगडे आनंद दौंडे सिद्धेश्वर माने गुलाम तांबोळी आदीसह संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. आगामी पत्रकार दिनाच्या निमित्त नूतन कार्यकारणी निवड व पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली होती.
संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदासाठी दैनिक सकाळचे पत्रकार दत्तात्रय खंडागळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे बैठकीचे अध्यक्ष मोहन मस्के यांनी जाहीर केले. तसेच सचिव पदासाठी मिनाज खतीब कार्याध्यक्ष पदासाठी आनंद दौंडे व उपाध्यक्ष पदासाठी गुलाम तांबोळी यांचे एकमेव अर्ज आल्याने सर्व पदाधिकारी निवडी एकमताने संपन्न झाल्या.
संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.