जवळा पंचक्रोशीत भक्तिमय वातावरणात गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना.

जवळा(प्रशांत चव्हाण) जवळा गाव पंचक्रोशीत श्री.गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. जवळा गाव व आसपास असणाऱ्या चार वाड्यांवर गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत आला रे आला गणपती आला अशा घोषणा देतश्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तसेच प्रत्येक घरोघरी श्री.गणेशाची विधिवत भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आज उत्साहाचे वातावरण दिसून आले.जवळा येथील मेन चौक, संभाजी चौक, घेरडी रोड,श्री.म्हसोबा रोड या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
सकाळपासूनच गणेश भक्तांनी श्री गणेशाच्या आकर्षक मूर्ती सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी कुटुंबासह स्टॉलवर गर्दी केली होती.गणेश आगमनाबरोबर येत्या मंगळवारी श्री.गौरीचे आगमन होत आहे. त्याची तयारी महिला वर्ग करताना दिसत आहेत.गौरी पुढे ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांसह केळी सफरचंद इत्यादी फळे बाजारात विक्रीसाठी दाखल झाली असून तसेच गौरी सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले.गौराईच्या सणामुळे महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे तसेच गणपती बाप्पाच्या आगमना बरोबर पावसाचे दमदार आगमन होऊ दे अशी प्रार्थना भाविकांनी मनोभावे गणेशाकडे केली. जवळा पंचक्रोशी मध्ये सगळीकडे गणेशाच्या आगमनामुळे गणेश भक्तामध्ये उत्साह संचारला आहे.