कष्टाने आणि निष्ठेने जीवनात मिळवलेल्या यशाचा आनंद अवर्णनीय-प्रा.डॉ.विधीन कांबळे; सांगोला विद्यामंदिर मध्ये इ.१२ वी निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांसाठी इ.१२ वी ची बोर्ड परीक्षा ही पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असते. या परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांच्या मनावर असतोच.शैक्षणिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा व जीवनाची जडणघडण उंचावण्यासाठी इ.१० वी, इ.१२ वी ही महत्त्वाची वर्षी असतात,यातून पुढील जीवनाची परीक्षा अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कष्टाने आणि निष्ठेने जीवनात मिळवलेल्या यशाचा आनंद अवर्णनीय असतो,असे प्रतिपादन सांगोला महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.विधीन कांबळे यांनी केले.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इ.१२वी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव म.शं.घोंगडे,प्राचार्य लक्ष्मण जागंळे,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार,बिभिषण माने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य लक्ष्मण जागंळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना बोर्ड लेखी परीक्षेच्या संदर्भात नव्याने बदल झालेले नियम,सूचना दिल्या.यानंतर प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा प्राचार्य लक्ष्मण जागंळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना प्रा.कांबळे म्हणाले,परीक्षेमुळे आपल्यात सुधारणा करण्याची संधी मिळते.मनातील भीती निघून जाते.परीक्षा होईपर्यंत इतर कार्यक्रम,मोबाईल व टी.व्ही.न पाहण्याचा मौलिक सल्ला ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.यावेळी ज्युनिअर कॉलेज मधील प्रा.सौ.शहिदा सय्यद यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या,तर विद्यार्थ्यांपैकी कु.वैष्णवी ढोबळे, स्वाती हजारे,ऋतुजा शितोळे,ऋषी पैलवान व शिवतेज घाडगे यांनी मनोगते व्यक्त करून संस्था,शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.माधुरी पैलवान यांनी केले तर प्रा.तानसिंग माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये पालकांची व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.विद्यार्थ्यांनी कायम मोठं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास करून आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण करावा.मूळ उद्देशापासून कधीच भरकटू नका.आई-वडील,गुरुजनांना विसरू नका.अभ्यासाशिवाय पर्याय नसून अभ्यास करून चांगले करिअर करणे हा विद्यार्थ्यांचा उद्देश आहे.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके