सांगोला : जुनोनी येथून दूध घेऊन घराकडे परतत असताना अज्ञात वाहन चालकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघातात ५० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजता जुनोनी येथील सांगोला-मिरज हायवेवरील एका हॉटेलजवळ घडली. मच्छिंद्र करांडे (५०, रा.बुद्धेहाळ, करांडेवाडी, ता. सांगोला) असे
शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत, कुंडलिक विष्णु करांडे यांनी शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. मच्छिंद्र करांडे हे रविवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० च्या सुमारास जुनोनी येथून दूध घेऊन दुचाकीवरून मिरज सांगोला हायवेवरून करांडेवाडी गावी घराकडे निघाले होते.
वाटेत मिरजकडून भरधाव वेगाने सांगोलाकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जुनोनी शिवारातील हॉटेल जवळ पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला होता. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार केदारनाथ भरमशेट्टी करीत आहेत.