सांगोला तालुका

महूद येथे राज्यमार्गाच्या कडेला गटार बांधकामाची मागणी

सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

महूद, ता. २ : सांगोला तालुक्यातील महूद येथून जाणाऱ्या पंढरपूर- मल्हारपेठ या राज्यमार्ग क्रमांक ५३ च्या बाजूला महूद गावठाणात गटारच न  बांधल्याने सांडपाणी साठून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यमार्गाच्या बाजूला गटार ताबडतोब बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्यमार्ग क्रमांक ५३ पंढरपूर महूद,दिघंची, मायणी,उंब्रज,मल्हारपेठ असा जातो.या राज्य मार्गाचे नवीन काम होऊन सुमारे दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत.या मार्गावर येणाऱ्या सोनके, चिकमहूद,दिघंची अशा सर्वच गावांमधील रस्त्याचे व गटारांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे महूद गावठाणातील गटाराचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. ग्रामस्थांनी वारंवार तगादा लावल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर कार्यालयाने नुकतेच महूद  गावठाणातील उत्तर बाजूचे गटार बांधकाम पूर्ण केले आहे.मात्र या राज्य मार्गाच्या दक्षिण बाजूची गटार अद्यापही बांधलेली नाही.याबाबत येथील नागरिकांनी वारंवार पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदने देऊन हे गटार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.मुख्य रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दोन वर्षे झाली तरी महूद गावठाणातील रस्त्याच्या दक्षिण बाजूची गटार बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत.

दक्षिण बाजूची गटारच न बांधल्याने गावठाणात राहणाऱ्या नागरिकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.दक्षिण बाजूकडे राहणाऱ्या लोकांचे सांडपाणी वाहून जाण्यास कोणतीही व्यवस्था नाही.शिवाय पावसाचे सर्व पाणी दक्षिण बाजूला असणाऱ्या रस्त्याच्या कडेला साठून राहत आहे.पावसाचे हे पाणी दक्षिणेकडे राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसत आहे.यामुळे या बाजूला राहणाऱ्या तसेच संपूर्ण गावठाणातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच रस्त्याच्या दक्षिण बाजूने ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाईपलाईन गेलेली आहे.रस्त्याचे काम सुरू असताना या पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असल्याने या बाजूला राहणाऱ्या वसाहतीमध्ये व गावठाणा पुढील लोकांना पाणीपुरवठा करता येत नाही. गटाराचे बांधकाम तात्काळ पूर्ण झाल्यास ही पाईपलाईन दुरुस्त करून वंचित भागाला पाणीपुरवठा करता येऊ शकेल.पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने हे काम गांभीर्याने लवकरात लवकर पूर्ण करावे,अशी मागणी येथील नागरिकांनी व महूद ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

महूद मधून जाणाऱ्या पंढरपूर-मल्हारपेठ या रस्त्याच्या दक्षिण बाजूचे गटार बांधकाम अद्यापही केले नाही.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.यास येथील स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग करणीभूत आहे. गटार बांधकाम त्वरित करावे अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

  दत्तात्रय आसबे,ग्रामस्थ महूद

——-

पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्याच्या दक्षिण बाजूची गटार बांधकाम त्वरित करावे,यासाठी आम्ही बांधकाम विभाग पंढरपूर यांच्याशी सातत्याने पत्र व्यवहार करतो आहे. मात्र या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.– बाळासाहेब शिंदे,ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत महूद 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!