आशावर्कर म्हणून काम करणार्या आईचा मुलगा बनला असिस्टंट कमांडंट

सांगोला(प्रतिनिधी):- माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असल्यास जीवनातील ध्येय आपण निश्चित साध्य करू शकतो. ही गोष्ट भोसे (ता. मंगळवेढा) येथील अक्षय नाथाजी पाटील या शेतकरी कुटुंबातील युवकाने दाखवून दिली आहे. यूपीएससीच्या माध्यमातून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएफ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात अक्षय पाटील याने देशात 126 व्या रँकने उत्तीर्ण होत भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील असिस्टंट कमांडंट या पदाला गवसणी घातली आहे.
नाथाजी गणपत पाटील यांचे शेतकरी कुटुंब, कोरडवाहू शेती शेतीला पुरेसं पाणी नाही, जोडीला दूध अक्षय पाटील व्यवसाय करीत या कुटुंबाची उपजीविका चालते. पाटील यांना अक्षय, चैतन्य व स्नेहल अशी दोन मुले व एक मुलगी. नाथाजी पाटील यांची तिन्ही मुले शिक्षणात लहानपणापासूनच हुशार असल्याने आपली परिस्थिती हलाखीची असली तरी आपल्या मुलांना उच्चपदस्थ अधिकारी बनवण्याचे स्वप्न नाथाजी पाटील यांनी उराशी बाळगले होते. एकाच वेळी तीन मुलांचे शिक्षण चालू असताना शिकण्याची भरपूर इच्छा असताना देखील घरची परिस्थिती बघून छोटा मुलगा चैतन्य हा भारतीय सैन्य दलात भरती झाला. त्यानेही आपल्या भावाला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अक्षयला साथ दिली. अक्षयने 8 ऑगस्ट 2021 रोजी यूपीएससीची परीक्षा दिली होती. तिचा निकाल सप्टेंबर 2021 लागला होता. े परंतु त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर त्याने बँक, कृषी विभाग, पोस्ट आदी क्षेत्रातील परीक्षाही दिल्या होत्या. या सर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता व त्याला पोस्टात नोकरी देखील मिळाली होती. ऑगस्ट 2021 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल लागूनही मुलाखत व वैद्यकीय चाचणी राहिल्याने नंतर पुन्हा एकदा अक्षयने हीच परीक्षा देण्याचे ठरवून पोस्टातील नोकरी केवळ सात महिन्यात सोडून देत अभ्यासावर लक्ष केंद्रित करून दुसर्यांदा परीक्षा दिली.
ऑगस्ट 2021 दिलेल्या परीक्षेची मुलाखत व वैद्यकीय चाचणी 25 एप्रिल 2023 रोजी होऊन अक्षयने 126 वी रैंक प्राप्त केली. त्याला भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयातील असिस्टंट कमांडंट (ग्रुप ए) हे पद मिळाले. या यशाबद्दल अक्षयचे व पाटील परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नाथाजी पाटील यांची स्नेहल ही मुलगी देखील सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास कोल्हापूर येथे करत आहे. अक्षयचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण भोसे येथील घाडगे वस्ती जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. पाचवी ते सातवीपर्यंत भोसे येथील जिल्हा परिषद शाळा अवताडेवाडी येथे शिकला. बारावीपर्यंत तो सांगोला विद्यामंदिर येथे शिकला. बीएस्सी अँग्रीचे शिक्षण शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे झाले. एमएस्सी अॅग्रोचे शिक्षण त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पूर्ण केले. तेथे राहूनच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.
वडील शेतकरी, आई बबनताई यांनी अंगणवाडी सेविका म्हणून आपणास नोकरी मिळेल व आपल्या मुलांना थोडासा आर्थिक हातभार लावता येईल म्हणून मागील दहा वर्षाखाली प्रयत्न केला. परंतु ती नोकरीही बबनताई यांना मिळाली नाही. खचून न जाता बबनताई यांनी भोसे आरोग्यकेंद्रात आशा वर्कर म्हणून काम करीत आपल्या मुलाच्या शिक्षणास खारीचा वाटा म्हणून हातभार लावला. घरची परिस्थिती बेताची असताना देखील स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन नाथाजी पाटील व अक्षयची आई बबनताई यांनी आपल्या अक्षय या मुलाला उच्चपदस्थ अधिकारी बनवण्याचे स्वप्न साकार करून भोसे गावाचे नाव संपूर्ण देशात उज्वल केले. अक्षय पाटील यांनी भोसे गावातील पहिला उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा मान मिळविल्याने अक्षयचे व पाटील परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माझी तिन्ही मुले लहानपणापासून शिक्षणात नेहमीच आघाडीवर आहेत. माझे सासरे दिवंगत गणपत पाटील यांचे उच् अधिकारी बनण्याचे स्वप्न अक्षयने पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील माझ्या मुलाने जिद्दीने व चिकाटीने मिळवलेल्या या यशामध्ये त्याच्या प्राथमिक शिक्षणावेळी अक्षयला मार्गदर्शन करणार्या रमेश पाटील व गणेश पाटील या दोन शिक्षकांचे योगदान मोठे आहे.
बबनताई पाटील, अक्षयची आई –