बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने सांगोला शहर व तालुका महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठक संपन्न

सांगोला शहर व तालुक्यातील महिला राजकारण व समाजकारण या क्षेत्रामध्ये सर्व ताकदीनिशी उतरतील व समाजाचा सर्वांगीण विकास करतील यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहीन. सांगोला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका असल्याने महिलांना सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण मिळून कामाला लागू. तालुक्यातील सर्व गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना, शिबिरे घेऊ म्हणजे सर्व महिला ताठ मानेने जगू शकतील. असे मत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मुबीना मुलाणी यांनी व्यक्त केले.
शिवसेना पक्षाचे दोन गट निर्माण झाल्याने महिला आघाडी ची नव्याने बांधणी करण्यासाठी आ. शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार 1 जानेवारी रोजी शहर व तालुक्यातील महिलांची बैठक बोलवण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये महिला बाहेर न पडण्याचे कारण, महिलांच्या अडीअडचणी, पदासाठी इच्छुक महिला व नव्याने इतर महिला जोडण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
सदरच्या बैठकीस राजलक्ष्मी सागर पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा शोभाताई देशमुख, सीमा इंगवले, करुणा जांगळे, विद्या पवार, पुनम सावंत, राणीताई चव्हाण, आरती देशमुख, दिपाली माने, शुभांगी शेंडे निकिता पाटील, अशा देशमुख, श्वेता पवार, मनीषा लिगाडे यांसह इतर महिला उपस्थित होत्या.