सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

*असंख्य गीतातून व कवितेतून “गदिमा” आजही जिवंत आहेत- कवी सुनील जवंजाळ*

माडगूळे येथे ग. दि.माडगूळकर यांचा 46 वा स्मृति समारोह संपन्न

आटपाडी (प्रतिनिधी):- माणदेशी मातीचं सत्व आपल्या साहित्याच्या माध्यमातून ग. दि.माडगूळकर यांनी मांडले, या मातीत असणाऱ्या सामान्य माणसांचे नेतृत्व करत अतिशय सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी जे साहित्य साकारले,अनेक गीतांच्या माध्यमातून समाजाच्या अंतरंगापर्यंत साद घातली,असंख्य चित्रपट,लघुपट या माध्यमातून समाजाचं प्रतिबिंब लोकांसमोर मांडलं असे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा हे आजही अनेक गीतांच्या माध्यमातून व कवितांच्या माध्यमातून आपल्यामध्ये जिवंत आहेत असे प्रतिपादन माणदेशी कवी व व्याख्याते सुनील जवंजाळ यांनी केले.
आटपाडी तालुक्यातील माडगूळे येथील गदिमा पारावर  गदिमा हायस्कूल माडगूळे, कामगार कल्याण केंद्र माडगुळे, आटपाडी तालुका शिक्षक संघ व गदिमा प्रतिष्ठान माडगुळे यांच्या वतीने  ग. दि.माडगूळकर यांच्या  46 व्या  स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष टी.ए.चव्हाण, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे,दत्तात्रय मोरे, संस्थेचे विश्वस्त अजित चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश हसबे,सरपंच संगीता गवळी,प्राचार्य आर,पी. पाटील,प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक असिफ मुजावर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय विभुते,प्राथमिक शिक्षक संघाचे थोरात गटाचे अध्यक्ष अजित बुधावले,जिल्हा पतसंस्थेचे हनुमंतराव गायकवाड, ग्रामीण कथाकार जीवन सावंत,शरद चव्हाण,विजय पवार,  शहाजी वाक्षे,नितीन पवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रमुख पाहुणे कवी जवंजाळ म्हणाले की ग.दि. माडगूळकर यांनी साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करत या मातीच दुःख महाराष्ट्रासमोर मांडले. विविध प्रकारच्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली.कथा पटकथा,संवाद,लेखन याबरोबरच अभिनयाची ही वेगळी ओळख रसिकांसमोर मांडली. वाल्मिकी यांनी लिहिलेलं 28 हजार श्लोकांचे रामायण 56 गीतांमधून गीतरामायनाच्या माध्यमातून मांडत त्यांनी आधुनिक वाल्मिकी हा लोकमान्य किताब पटकावला. यावेळी सुनील जवंजाळ यांनी विविध प्रकारच्या आपल्या कविता सादर करत विद्यार्थ्यांना व रसिकांना मंत्रमुग्ध केले.विशेष म्हणजे पोटात भूक असतानाही ऐकण्याची भूक किती मोठी असते याचा प्रत्यय पहिल्यांदाच ग दि माडगूळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आला. प्राथमिक  शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील 15 प्राथमिक शिक्षकांना प्रमुख पाहुणे सुनील जवंजाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष टी.ए.चव्हाण, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर,गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे व इतर मान्यवरांच्या हस्ते गदिमा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माडगळे परिसरातील ग्रामस्थ युवक वर्ग विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदणे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!