महाराष्ट्र
पालकांनी विद्यार्थ्यांचे मित्र व्हावे – प्राचार्य अमोल गायकवाड

सांगोला (वार्ताहर) इयत्ता दहावीच्या पालक शिक्षक सहविचार सभेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड म्हणाले की सध्या शिक्षण प्रक्रियेमध्ये कृतीयुक्त शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, त्यामुळे पाठांतरापेक्षा आकलनावर जास्त भर देणे गरजेचे आहे. पालकांनी निरीक्षक होऊन विद्यार्थ्यांचे निरीक्षण करावे व विद्यार्थ्यांचे मित्र बनवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या व विद्यार्थी आणि शिक्षक या मधला दुवा बनावा. नियोजनपूर्वक केलेलं काम यशापर्यंत घेऊन जाते यावर्षी दहावीचा निकालसुद्धा तेवढा उत्कृष्ट लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
इयत्ता दहावीच्या पालक-शिक्षक सहविचार सभेमध्ये प्रास्ताविक मांडताना पर्यवेक्षक उत्तम सरगर यांनी दहावीसाठी चाललेल्या नाईट स्टडी, टॉपर योजना यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा त्रिकोण पाल्याच्या शैक्षणिक प्रगती मधला महत्त्वाचा घटक आहे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रवीण गायकवाड ,सौ.गौरी भोसले , आगतराव वाघमोडे सर व प्रमोदिनी सुतार या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले व शैक्षणिक सुधारण्यासाठी सूचना मांडल्या.
या सहविचार सभेसाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे सर, पर्यवेक्षक उत्तम सरगर, इयत्ता दहावीला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि 125 पालक उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे तर आभार प्रदर्शन बंडू लेंडवे सर यांनी केले.



