क्रांतिकारकांच्या भक्कम इतिहासावरच देशाचे उज्ज्वल भविष्य – आमदार ॲड शहाजीबापू पाटील;सांगोला विद्यामंदिर येथे देशभक्तांची ओळख, शाळा तेथे क्रांती मंदिर अभियान उद्घाटन संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ) अनादिकाळापासून भारताचा इतिहास सर्व बाजूंनी जाज्वल्य असा आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचा, देशभक्तांचा भक्कम इतिहास खूप प्रेरणा देणारा आहे.त्याची देशभक्ती,त्याग,धाडस लक्षात घेण्याची गरज आहे. आज देशभक्तांची ओळख, शाळा तेथे क्रांती मंदिर या अभियानाच्या माध्यमातून हा इतिहास विचार आणि कृती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे. त्यामुळे उद्याचा भारत उज्ज्वल होईल असे प्रतिपादन आमदार ॲड शहाजीबापू पाटील केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे ‘देशभक्तांची ओळख,शाळा तेथे क्रांती मंदिर ‘ अभियान उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सां.ता.शि.प.प्र.मंडळ,सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य गंगाधर घोंगडे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार ॲड शहाजीबापू पाटील म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहावा असा आहे.यामध्ये या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे योगदान अमोघ आहे.या सर्वांचा इतिहास देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या पुढाकाराने या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जातो आहे हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर स्वातंत्र सेनानी, देशभक्त गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला व त्यानंतर फीत कापून अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले
- देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी खूप मौलिक कार्य केले आहे.त्यांच्या विचारांचे बाळकडू या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत दिले जात आहे. या अभियानात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे संग्रहात असलेल्या २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १०००० देशभक्तांची माहिती व १५००० हुतात्म्यांची माहिती
देणारा असा देशभक्तकोश या साहित्याचा दुर्मिळ असा डिजीटल डेटा व प्रदर्शन सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदीर हे अभियान पोहोचेल व भारतीय क्रांतिवीरांच्या बलिदानाचा, राष्ट्र कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांना अधिक ज्ञात होईल.
चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार