सांगोला (प्रतिनिधी):- दलित समाजाच्या न्याय व हक्का साठी काल बुधवार दि.12 बुधवार रोजी सांगोला पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.सांगोला पंचायत समितीच्या भ्रष्ट व निष्क्रिय कारभारांचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच दलितांच्या न्याय हक्कासाठी लहुजी पँथर सेनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी मोर्चाचे नियोजन केले होते विराट मोर्चा पंचायत समितीवर काढण्यात आला तथापि या मोर्चाची शासन दरबारी दखल न घेतली गेल्यास आगामी काळात संपूर्ण ताकतीनिशी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे यांनी दिला आहे.
या मोर्चाला संबोधित करताना विधवा, दलित महिलांकडून पैसे घेणार्या भ्रष्ट अधिकार्यांना चोप देणार्यांना 51 हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याची आक्रमक घोषणा संघटनेचे नेते अॅड.अभिषेक कांबळे यांनी केली.
यावेळी मोर्चास लहुजी पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांसह महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या पंचायत समिती मधील भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढत पुढे बोलताना ड.कांबळे म्हणाले की विधवा महिला ज्यांच्या घरात कर्ता पुरुष नाही अश्या महिलांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक पंचायत समिती मधील अधिकारी यांच्या मार्फत केली जाते. घरकुल मंजूर करण्यासाठी व हप्ता बँकेत जमा करण्यासाठी ग्रामसेवक, कारकून दलित समाज्यातील लोकांकडून तीन हजार रुपयांची मागणी करत आहेत. दलित वस्ती साठी राखीव 15% निधी सरपंच ग्रामसेवक इतर ठिकाणी खर्च करून दलित वास्त्यांना विकासापासून वंचित ठेवत असुन अश्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचे काम गटविकास अधिकारी करत आहेत. घरकुल मंजूर असुन वाळू महाग मिळत असल्यामुळे घरकुल पूर्ण होत नाहीत अशी विदारक परिस्थिती घरकुल लाभार्थ्यांची झाली असल्याचे सांगत पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचे अॅड. अभिषेक कांबळे यांनी निषेध केले.
याप्रसंगी बोलताना लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष नितीन रणदिवे म्हणाले की सांगोला तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांपैकी सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि दलित बांधवांवर कोठे अन्याय होत असेल तर ते कार्यालय म्हणजे पंचायत समिती त्यामुळे पंचायत समितीवर मोर्चा काढून त्यांच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश लावण्याचे काम आम्ही करत आहोत पंचायत समिती चे अधिकारी भ्रष्ट झाले असून दलितांची पिळवणूक करण्याची एक कलमी कार्यक्रम पंचायत समितीमध्ये सुरू असल्याने या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहील पंचायत समिती तो झाकी है,जिल्हा परिषद अभी बाकी है असा गर्भित इशारा यावेळी नितीन रणदिवे यांनी दिला.
या मोर्चामध्ये पोलीस मित्र संघटनेच्या मायाताई रणदिवे, भाजपा नेते माणिकराव सकट, शिवसेना नेते रघुनाथ ऐवळे, लहुजी पँथर सेनेचे महेश वाघमारे,धोंडीराम कांबळे, राजाभाऊ गुळीक, महिला शक्ती शस्त्रच्या जयश्री सावंत आदी. मान्यवरांनी अत्यंत तीव्र शब्दात आपले मनोगत व्यक्त करत पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला.
या मोर्चाच्या माध्यमाने निवेदन देऊन शासन दरबारी पुढील मागण्या करण्यात आल्या.. घरकुल मंजूरीसाठी व उर्वरित हप्ते बँकेत जमा करण्यासाठी संगनमताने पैसे मागणार्या ग्रामसेवक, कारकून, गटविकास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. जुजारपूर गावातील दलित वस्तीमधील पेव्हर ब्लॉकचे काम टेंडर ओपन व्हायचे आत केले आहे. तरी या कामाची सखोल चौकशी करुन दोषी सरपंच, ग्रामसेवक व बोगस ठेकेदार यावर कठोर कारवाई करावी. महिला व बाल कल्याण विभागामध्ये महिलांसाठी सांगोला पंचायत समितीमार्फत वाटप करण्यात आलेल्या साधन सामुग्रीमध्ये मोठ्या प्रमाणात (बोगस लाभार्थी दाखवून) भ्रष्टाचार केला असून संबंधीतावर खातेनिहाय चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत. घरकुलधारकांना मोफत वाळु पुरवठा तात्काळ करण्यात यावा. सन 2022-23, 2024 मध्ये मागासर्व लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजना व लाभार्थी यादी गावोगावी सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्तीमध्ये प्रसिध्द करण्यात यावी. दलित वस्तीमध्ये कामासाठी प्रामुख्याने मागासवर्गीय ठेकेदारांना प्राधान्य देण्यात यावे.मागासवर्गीयासाठी ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित 15% निधी ग्रामसेवक व सरपंच संगनमताने इतर ठिकाणी खर्च करत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून तो थांबवावा. तसेच निधी खर्च करण्यासाठी असलेले नियम व करण्यात आलेला सन 2022,23, 2024 मध्ये करण्यात आलेला खर्च प्रत्येक ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्तीमध्ये प्रसिध्द करावा.
हा मोर्चा सांगोला तहसील कार्यालयापासून निघून पंचायत समिती कार्यालयावर धडकला यावेळी सर्व महापुरुषांना अभिवादन करत लहुजी पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या आवारात टायर जाळून निषेध केला. यावेळी कार्यकर्ते व महिला अतिशय आक्रमक झालेल्या दिसून आल्या.