उपलब्ध चारा पाण्याचा आराखडा, टँकरचे प्रस्ताव तयार करून सादर करा- आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला -तालुक्यात दीड महिन्यापासून पावसा अभावी जनावरांच्या चारा पाणी बरोबरच माणसाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा स्त्रोत किती दिवस पुरेल याची अधिकारी यांनी माहिती घ्यावी. ग्रामसेवक तलाठी यांनी टंचाई भागातील उपलब्ध चारा पाण्याचा आराखडा, टँकरचे प्रस्ताव तयार करून माझ्याकडे सादर करावेत. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना भेटून जिल्हाधिकारी यांना जनावरांसाठी चारा पाण्याची सोय, टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने सूचना करून तालुक्यातील संकटावर मात केली जाईल असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी टंचाईही आढावा बैठकीत व्यक्त केला.
सांगोला तालुक्याची टंचाई आढावा बैठक आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पंचायत समिती सांगोला येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील , शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार, तहसीलदार संजय खडतरे, नायब तहसीलदार किशोर बडवे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता सुरेश कमळे सार्वजनिक बांधकाम अभियंता अशोक मुळगीर, वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वीज अभियंता शिंदे , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता नगरकर , संभाजी आलदर, प्रा. संजय देशमुख , सुभाष इंगोले, शिवाजी घेरडे,आरपीआयचे खंडू सातपुते, काँग्रेसचे रवींद्र कांबळे, शिवसेनेचे हरिभाऊ पाटील, मनसेचे विनोद बाबर,हनुमंत कोळवले सर सरपंच दादासाहेब घाडगे, विविध गावचे सरपंच, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी तहसीलदार बीडीओ यांनी टंचाई सदृश्य परिस्थिती संपेपर्यंत कोणत्याही अधिकारी यांना रजेवर पाठवू नये ग्रामसेवक तलाठी यांनी गावात थांबून चारापाणी टँकरचा आराखडा तयार करून येत्या दोन दिवसात संबंधित कार्यालयास पाठवावा टंचाई काळात अधिकाऱ्यांनी लोकांची चेष्टा न करता आपली जबाबदारी पार पाडावी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन केल्यास नागरिकांच्या तक्रार येणार नाहीत अशा सूचना केल्या.
शेकापचे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी पावसाअभावी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीप पेरण्या होऊ शकल्या नाहीत असे सांगून वीज वितरण कंपनीचे अधिकारी कोणाचेच ऐकत नाहीत. अनेक गावात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. तालुक्यातील टंचाईचा आराखडा आमदार शहाजी बापू पाटील यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात मांडून दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढावा अशी विनंती केली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे मनसेचे विनोद बाबर आदींनी विचार व्यक्त केले.
या बैठकीत पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष इंगोले यांनी एखतपुर गावाला एमजीपी मधून पाणी देणार की ? नाही याचा आजच खुलासा करावा, दीड महिन्यापासून गावाचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. येत्या दोन दिवसात पाण्याची व्यवस्था न केल्यास शिरभावी योजना बंद पाडू असा इशारा दिला. यावेळी संभाजी आलदर यांनी १२ वर्षानंतर यंदा खरीप हंगामात बाजरीचा पेरा न झालेले वर्षे असल्याचे सांगून टेंभू, म्हैसाळ योजना, निरा भाटगर तलावातील मृत साठे वरचे शेतीला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. जनावरांच्या चारा व पाणी प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा असे सांगितले यावेळी लोटेवाडीचे सरपंच विजय खांडेकर, इटकी चे सरपंच ,कोळे येथील सिताराम सरगर ,वाणीचिंचाळे जितेंद्र गडहिरे लोणविरे सरपंच दत्तात्रय गाडे ,मेडशिंगी येथील प्रताप इंगोले तसेच विविध गावातील पुढारी, ग्रामस्थांनी आपापल्या गावात पावसाअभावी निर्माण झालेली पाणी टंचाई, वीज वितरण कंपनीच्या संदर्भात तक्रारी, जलजीवन मिशनच्या कामासंर्दभात तक्रारी, अडचणी मांडल्या. संबंधित गावांना शिरभावी योजनेतून पाणी मिळणार नसेल तर टॅंकरने पाणी उपलब्ध करून नागरिकांची तहान भागवावी अशा व्यथा मांडल्या.



