महूद ते सांगोला राष्ट्रीय महामार्ग; गुणवत्ता व गती नसलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास
महूद, ता. २८ : महूद ते सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच.९६५ जी या सुरू असलेल्या महामार्गाच्या कामात गुणवत्ता व गतीही नाही. कोणतीही गुणवत्ता व गती नसलेल्या या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून नागरिकांनाच वेठीस धरल्याचा प्रकार या कामामुळे होत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या महूद-सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच.९६५ जी या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणावर होत होती.दुहेरी वाहतुकीसाठी सुमारे दहा मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे.केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत देशभरात निर्माण होत असलेल्या रस्त्यांचे कौतुक केले जाते.मात्र महूद ते सांगोला सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामात गुणवत्ता व गतीही नाही. सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या कामाची मंजुरी आहे.यापैकी सुमारे १५ किलोमीटर हून अधिक लांबीचा रस्ता ठेकेदाराने अस्ताव्यस्तपणे उकरलेला आहे.रस्त्याच्या विविध भागात टाकलेली खडी ही अस्ताव्यस्तपणे टाकली आहे. ही खडी खाली घसरून आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.खडी वरून घसरून पडल्याने अनेक दुचाकी स्वारांचा अपघात झाला आहे.
या अपघातांमुळे अनेक जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. या रस्त्याच्या कामावर बऱ्याच ठिकाणी सुरक्षा विषयक तरतुदी केलेल्या नाहीत. या कामाचा अपघात विमा उतरविला आहे का ? असाही प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे. कारण रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत अपघातग्रस्तांना केली जात नाही.
सुमारे २४ किलोमीटर लांबीचा दुहेरी वाहतुकीसाठी दहा मीटर रुंदीचा काँक्रिटीकरण रस्ता बनविला जात आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता. २५३.७८ कोटी रुपये असून कंत्राटाची रक्कम ११३.५० कोटी रुपये आहे. यामध्ये महूद-अकलूज मार्गावरील एक, वाकी-शिवणे व चिंचोली तलाव अशा तीन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.तीन छोटे पूल तर ९ बस निवारा शेड उभारण्यात येणार आहेत. काम चालू होऊन सुमारे चार महिने उलटून गेले तरीही या मार्गावरील केवळ पूल पाडण्याचे काम झाले आहे.कोणत्याही पुलाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात ही झाली नाही.या रस्त्याच्या कामासाठी सबग्रेड,जीएसबी,डीएलसी,पीक्यूसी असे चार थर देण्यात येणार आहेत. या प्रत्येक थराची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी केली जाते आहे का ? अशी शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. वाकी ते शिवणे तसेच चिंचोली तलाव ते एखतपूर पाटी या दरम्यान काही भागात डीएलसी थराचे काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा थर निकृष्ट पद्धतीने केला आहे.कारण सध्या दुचाकी वाहनांच्या येण्या-जाण्याने या थराची खडी निघालेली आहे.यामुळे या कामाच्या प्रत्येक थराची तपासणी शासकीय यंत्रणेमार्फत होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे. प्रत्येक थरासाठी वापरली जाणारी खडी योग्य प्रतीची आहे का ? हेही तपासणे आवश्यक आहे.
सध्या या मार्गावरील पाणी वाहून नेणाऱ्या कालवा पुलांचे काम सुरू केले आहे.या मार्गाच्या कामाबाबत मार्गावरील रहिवाशांच्या व शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत.त्यासाठी अधिकाऱ्यांनी महूद, शिवणे,वाकी येथील ग्रामस्थांची स्वतंत्र बैठक घ्यावी व शंकांचे निरसन करावे अशी मागणी पंचायत समितीच्या आमसभेमध्ये करण्यात आली असल्याचे माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी सांगितले.मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप पर्यंत झालेली नाही.या मार्गावरील नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले नाही.वाकी येथील हनुमान मंदिर या महामार्गाच्या मध्येच येत आहे. याबाबत येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मंदिरासाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी केली आहे.मात्र हा विषय कोणीच गांभीर्याने घेतला नसल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे. वाकी व शिवणे येथे बांधण्यात आलेल्या गटारींच्या दरम्यान रस्त्याची रुंदी कमी होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.एकंदरीत या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राखली जात नसल्याने याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महामार्गाचे काम सुरू करताना नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे होते. उकडलेल्या रस्त्यावर पाणी मारत नसल्याने धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. या मार्गाच्या भूसंपादनाबाबत अनेक शंका असतानाही पोलिसांची भीती दाखवून काम सुरू आहे. या कामाची माहिती देणारा फलक कुठेही लावण्यात आला नाही.- बाळासाहेब वाळके, शिवणे
———–
या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व संत गतीने होत आहे.काम सुरू असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. अपघातग्रस्तांना कोणत्याही प्रकारची मदत ठेकेदार कंपनीने केली नाही.- किसन काटकर, वाकी
रस्त्याच्या कामामध्ये कोठेही गुणवत्ता राखली जात नाही. अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे साहित्य वापरले जात नाही. कामाच्या प्रत्येक थराची गुणवत्ता शासकीय यंत्रणेने तपासणी आवश्यक आहे.- हरिभाऊ पाटील