यंदाचा मानाचा राज्यस्तरीय “आदर्श व्यक्तिमत्त्व सामाजिक सन्मान पुरस्कार” तानाजी मिसाळ यांना प्रदान
“महात्मा जनकल्याण प्रतिष्ठान संचलित, रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली यांचा मानाचा राज्यस्तरीय “आदर्श व्यक्तिमत्त्व सामाजिक सन्मान पुरस्कार” पाचेगाव खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते, शेकापचे प्रभावी नेते तानाजी शेषाप्पा मिसाळ यांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप फेटा, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे होते. हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि. 26 नोव्हेंबर रोजी आष्टा येथील हेवन हॉल येथे उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.
तानाजी शेषाप्पा मिसाळ हे पाचेगाव खुर्द नगरीतील एक प्रभावशाली नेतृत्व आहे. गोरगरीब रंजल्या गांजल्याना त्यांचा नेहमीच मायेचा हात असतो हे पाचेगाव खुर्द मध्ये सर्वश्रुत आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल महात्मा जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थेच्या रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन ने घेऊन त्यांना यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक सन्मान पुरस्कार सांगली येथील प्रमुख पाहुणे पै. संजय हजारे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुडचिकर, राज्याध्यक्षा शुभांगी पाटील, उपाध्यक्ष अंकुश राजमाने यांच्या हस्ते देण्यात आला.
सामाजिक काम करत असताना कोणताही पुरस्कार मिळावा या हेतूने कोणच काम करत नसतं पण त्यातूनही अचानक असा पुरस्कार मिळाला की समाजकार्य करायला अजून ऊर्जा मिळते आणि उत्साह द्विगुणीत होतो तानाजी मिसाळ यांनी बोलताना सांगितले. आपल्या गावातील एका नेत्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने पाचेगांव खुर्द येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
—————————
आम. भाई गणपतरावजी देशमुख साहेब व वडील शेषाप्पा मिसाळ यांच्यापासून मिळालेला सामाजिक वारसा व सभापती ताई मिसाळ यांच्या काळात झालेलं समाजकार्य याची दखल म्हणजे हा मिळालेला पुरस्कार असून, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा व गावाचा आहे
– तानाजी शेषाप्पा मिसाळ, शेकाप नेते, पाचेगाव खुर्द.