मुख्यमंत्र्यांकडून शहरातील १४ विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला शहरातील विविध विकासकामांसाठी आणि लोणार, मातंग, रामोशी, चर्मकार, हटकर, शिंपी, महर्षी वाल्मिकी कोळी, नाभिक समाजासाठी समाजमंदिर व सभागृह बांधणे, व्यापारी संकुल बांधणे, मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा १४ विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकासकामांना चालना दिली आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच सर्वच समाजासाठी सभागृह, समाजमंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे २ कोटी रुपये, मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृतिभवन बांधणे १ कोटी रुपये, नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाजमंदिर बांधणे १ कोटी रुपये, खारवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाजमंदिर बांधणे ५० लाख रुपये, हटकर समाजासाठी नगरपालिका जागेत समाजमंदिर बांधणे १ कोटी रुपये, शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाजमंदिर बांधणे ५० लाख रुपये, नाभिक समाजमंदिर मिरज रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणे ५० लाख रुपये, यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे १ कोटी रुपये, नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाजमंदिर बांधणे १ कोटी रुपये, लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक ४ मध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे २ कोटी ५० लाख रुपये, सिटी सर्व्हे क्रमांक २५८५ येथे सुधारणा करणे ५० लाख रुपये, छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी संकुल बांधणे ५ कोटी रुपये, सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणे ३ कोटी रुपये अशा १४ विकास कामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.