खरीप हंगामासाठी निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यासाठी पाणी- आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला ( प्रतिनिधी) निसर्गाच्या लहरीपणामुळे सांगोला तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीची शासन दरबारी दखल घेऊन तातडीने निरा उजवा कालव्यातून २४ जुलै ०२३ रोजी खरीप हंगामासाठी तसेच शेतातील उभे पीके, फळबागांसह जनावरांसाठी पाणी सोडले आहे. लवकरच टेंभू, म्हैसाळ योजनेतूनही माण, कोरडा नदीत पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
चालू वर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून पावसाअभावी सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके फळबागा जळून चालल्या आहेत तर जनावरांच्या चारा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चालू वर्षीचा खरीप हंगामही पावसाअभावी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे निरा उजवा कालव्यातून सांगोला व पंढरपूर तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. पाटबंधारे विभागाकडून वीर, भाटघर, नीरा -देवधर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेऊन त्याबाबत नियोजन केले दरम्यान खरीप हंगाम पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पुणे आवश्यक असते परंतु धरण ज्या जिल्ह्यात आहे त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांची परवानगी घेऊन कालवा सल्लागार समिती बैठकीच्या अधिन राहून त्यांनी निरा उजवा कालव्यातून सांगोला व पंढरपूर लाभ क्षेत्रातील खरीप हंगामासाठी पाणी सोडण्याची परवानगी दिली आहे असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. त्यानुसार २४ जुलैला धरणातून निरा उजवा कालव्यात पाणी सोडले असून, येत्या तीन दिवसात प्रत्यक्ष पाणी सांगोला हद्दीत पोहचणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले
चालू वर्षी पावसाअभावी सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री महोदय, पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्याची दखल घेऊन खरीप हंगामासाठी निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्यासाठी पाणी सोडले आहे – आ.शहाजी बापू पाटील