जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी

सुमारे ४०० वर्षांपूर्वी सबंध मुलुख परकीय आक्रमणाच्या विळख्यात अडकला असताना छत्रपती शिवरायांसारख्या युगपुरुषाला जन्म देऊन सामान्य लोकांच्या हितासाठी अष्टप्रधान मंडळाची संकल्पना सर्वप्रथम राबविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच काम करण्याचा आपला प्रयत्न राहील. असे प्रतिपादन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले. गुरुवार दि १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सांगोला आयोजित कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी सतीश सावंत, संजय बाबर, दत्तात्रय खंडागळे, मिनाज खतीब, दिलीप घुले, अमेय मस्के, किशोर म्हमाणे, आनंद दौंडे, दीपक भाकरे, गुलाम गौस तांबोळी, मोहसीन मुलाणी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याची स्थापना होण्यापूर्वी मुघलशाही आदिलशाही निजामशाही आणि कुतुबशाही यांच्या जुलुमी राजवटीत रयत पिचून गेली होती अशा परिस्थितीत भयाण काळोख्या रात्री नंतर सूर्योदय व्हावा त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना जन्म देऊन त्यांना रयतेच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊ यांनी प्रेरणा दिली. सामान्य रयतेचे हित डोळ्यासमोर ठेवून अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना जिजाऊंनीच शिवरायांना समजावून सांगितली आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली. त्यांच्याच शिकवणीनुसार सामान्य नागरिक कामाच्या केंद्रस्थानी ठेवून आपण सांगोला शहराचा कारभार करण्याचा प्रयत्न करू राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय हे प्रशासनात काम करतांना नेहमीच आपले आदर्श राहतील असेही यावेळी डॉ. सुधीर गवळी यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खंडागळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याला उजाळा दिला.