सांगोला विद्यामंदिर नूतन प्रशासकीय दालन व लिपिक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न…

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे शाळेच्या कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या नूतन प्रशासकीय दालन व लिपिक कार्यालयाचे उद्घाटन सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.बाबुरावजी गायकवाड व ज्येष्ठ विधीज्ञ मा.उदयबापू घोंगडे यांच्या शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
३ मार्च १९५२ रोजी स्थापन झालेल्या विद्यामंदिर मध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या विद्यार्थी संख्येबरोबरच गुणवत्ता वाढीचा आलेखदेखील नेहमीच वरचढ राहिला आहे. विद्यामंदिरचा वाढता विस्तार लक्षात घेता विद्यार्थी, येणारे पालक या सर्वांच्या सोयीसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या वतीने सुसज्ज असे मुख्याध्यापक व प्रशासकीय दालन तसेच प्रशस्त असे लिपिक कार्यालय नव्याने तयार करण्यात आले आहे. या प्रशासकीय दालनाचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ व संस्थेचे शुभचिंतक ॲड.उदयबापू घोंगडे यांचे शुभाहस्ते तर लिपिक कार्यालयाचे उद्घाटन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय बाबुरावजी गायकवाड यांचे शुभाहस्ते संपन्न झाले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता प्रभावी अध्यापन व्हावे यासाठी संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या पॉवर प्रोजेक्टर चे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळेमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता भव्य अशा बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाची पाहणी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आली.
याप्रसंगी आपल्या मनोगत आतून ॲड.घोंगडे यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या संस्कारांनीच आम्ही घडलो असे सांगत कै.बापूसाहेबांबद्दल तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली; तर बाबुरावजी गायकवाड यांनी संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत दिवसेंदिवस विद्यामंदिरच्या होणाऱ्या गुणात्मक वाढीबरोबरच भौतिक सुविधांच्या विस्ताराचे आपल्या मनोगतातून कौतुकही केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व प्रशासकीय अधिकारी व लिपिक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य गंगाधर घोंगडे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषण माने,पोपट केदार व अजय बारबोले हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले. प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन सोहळा आनंदात पार पडला.