सांगोला येथे पाणी टंचाई विषयक आढावा बैठक संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ हे नैसर्गिक संकट असून पाणी जपून नाही वापरले तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सर्व क्षेत्र भिजत नाही तो पर्यंत पाणी बंद करू देणार नाही. असा इशारा देत पाण्याच्या नियोजनात चूक झाली तर अधिकार्यांना माफ करणार नाही असा सज्जड दम खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
अपुर्या पर्जन्यामुळे सांगोल्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी टंचाई विषयक विविध बाबींवर चर्चा करणेसाठी काल गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायं. 05.30 वाजता बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे पाणी टंचाई विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निबाळकर बोलत होते. यावेळी चार्या संंदर्भात टंचाई जाहीर करुनच पालकमंत्री यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे सांगत 72 तासामध्ये पाण्याचे नियोजन करुन पाण्याचे वेळापत्रक शेतकर्यांपुढे ठेवा अशा सूचना अधिकार्यांना यावेळी देण्यात आल्या.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, टंचाई गावातील प्रस्ताव पाठवून द्या, कोणतेही काम तटणार नाही याची दक्षता घ्या. कोरडा संदर्भात जे नियोजन केले आहे त्यात बदल करू नका. सांगोला शहराला 20 तारखेपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले.
यावेळी पंढरपुरचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी आपले मनोज व्यक्त केले.
बैठकीस चेतनसिंह केदार – सावंत, खंडू सातपुते, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक उपस्थिती होते.प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी माळी यांनी केले. यावेळी उजनी धरणातून २० तारखेला साधारण पाणी सोडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद असून सध्या तीन गावातून पाणी प्रस्तावाची मागणी आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, निरा उजवा कालवा, टेभू योजना, म्हैसाळ योजनेचा आढावा सादर करण्यात आला.