गुढीपाडव्यानिमित्ताने महूद येथील मारुती मंदिरात पाडव्याचे वाचन

महूद, ता.९ : गुढीपाडव्यानिमित्ताने येथील मारुती मंदिरात पाडव्याचे वाचन करण्यात आले. तसेच पाडव्यानिमित्ताने येथील शंभू महादेवाच्या कावडींनी गावातील विविध मंदिरात वाजत गाजत जाऊन जलाभिषेक केला.
गेल्या शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार येथील मारुती मंदिरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाडवा वाचन म्हणजेच नवीन वर्षात येऊ घातलेल्या फलाचे वाचन केले. सुरुवातीला माजी उपसरपंच दिलीप नागणे व लालासाहेब लवटे यांच्या हस्ते नवीन पंचांगाचे पूजन करण्यात आले. हिमालय देशपांडे यांनी पौरोहित्य केले.नवीन वर्षात येवू घातलेल्या फलाचे वाचन करताना हिमालय देशपांडे यांनी सांगितले की, चालू वर्षीचे संवत्सर हे क्रोधीनाम संवत्सर आहे. चालू वर्षी मेघ निवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे. त्यामुळे खंडित वृष्टी होईल.धान्य कमी होईल.यावर्षी चार आढक म्हणजे प्रजन्यमान चांगले असून सहा भाग नद्या व पर्वतावर तर चार भाग भूमीवर याप्रमाणे पर्जन्यमान होईल.
मारुती मंदिरात झालेल्या पाडवा वाचन कार्यक्रमास सेवानिवृत्त तहसीलदार उत्तम तपासे,जयवंतराव नागणे,रामचंद्र कुंभार,माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, उमेश पाटील,संजय चव्हाण,कैलास खबाले,रुपेश देशमुख,पप्पू अनपट, उत्तम गुरव,अशोक गुरव,गणेश गुरव, संजय धोकटे यांच्यासह महूद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाडव्यानिमित्त येथील शंभू महादेवाची मानाची महाजन यांच्या कावडीने हालग्यांच्या कडकडाटात व हर हर महादेव च्या जयघोषा मध्ये गावातील विविध मंदिरात जाऊन जलाभिषेक केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण भक्त उपस्थित होते.