म्हैसाळचे पाणी कोरडा नदीत दाखल
उपलब्ध पाणीसाठा पाहून जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करू : मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगली येथे टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या पाणी वाटप नियोजन बैठकीत केलेल्या आक्रमक मागणीला यश मिळाले असून रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातील कोरडा नदीत दाखल झाले आहे. म्हैसाळ योजनेचा उपलब्ध पाणीसाठा पाहून आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त पाणी सांगोला तालुक्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले आहे. म्हैसाळचे पाणी सांगोला तालुक्यातील कोरडा नदीवरील जवळा बंधाऱ्यातून पुढे आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी आनंदित झाला आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक रविवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडली होती. या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आणि सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती असल्याने, आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे नियोजन करत असताना टेल टू हेड प्रमाणे सर्वप्रथम सांगोला तालुक्यातील शेतीला मिळाले पाहिजे. सांगोला तालुक्यात चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी सांगोला तालुक्यातील रब्बीची पिके, नागरिकांना आणि जनावरांना जीवनदान देण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करून नियमाप्रमाणे पाणी वाटप करावे. अशी आग्रही मागणी आजी माजी आमदारांनी केली होती.
सांगली येथील २९ ऑक्टोंबर रोजीच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आक्रमक झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्नी आमदार शहाजीबापू पाटील यांनीही आपली बाजू लावून धरल्याने आजी माजी आमदारांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.