वाढदिवशीही डॉ.अनिकेत देशमुख यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सांगोला(प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमीच कार्यरत असणारे शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी वाढदिवसादिवशीही आपल्या वैद्यकीय सेवाकार्यातून अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
मंगळवार दिनाक 3 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्वत:च्या वाढदिवशी पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक एसीएल पुनर्रचना म्हणजेच दुर्बिणद्वारे पायातील शीर जोडण्याची शस्त्रक्रिया केली. सदरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉ.अनिकेत देशमुख यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीही अनावश्यक कार्यक्रमांना फाटा देत, कोणताही डौलमोल न करता सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त राहून एक आदर्श आजच्या पिढीपुढे ठेवला आहे.
स्व.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू व शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण नुकतेच पुर्ण झाले आहे. गोरगरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी ते पंढरपूर येथे वैद्यकीय सेवेत सध्या कार्यरत आहेत. 3 ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. स्व.भाई.गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे त्यांनीही कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते.
शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी काम करताना नेहमीच 20 % राजकारण व 80 % समाजकारण करत असतो. स्व.भाई.डॉ.गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेची सेवा केली. स्व.आबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन सध्या डॉ.अनिकेत देशमुख वैद्यकीय सेवेत कार्य करत आहेत. दुसर्यांसाठी काही करायला मिळणे हीच वाढदिवसाची खरी भेट मानत समाजासाठी झोकून देत डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांचे सोशल मीडियासह सांगोला तालुक्यात भरभरून कौतुक होत आहे.