सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

आ.शहाजीबापू पाटील यांचेकडून फुटलेल्या कालव्यासह नुकसानग्रस्त शेती व फळपिकांची पाहणी

सांगोला ( प्रतिनिधी ): टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचेगाव बु ता. सांगोला घाटनांद्रे रोड लगत कवठेमंहकाळकडे जाणाऱ्या कालव्यास मध्यभागी भगदाड पडून फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेती व फळ पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आमदार शहाजी बापू पाटील यांनी काल रविवारी तातडीने पाचेगावास भेट देऊन फुटलेल्या कालव्यासह नुकसान झालेल्या शेती व फळपिकांची पाहणी केली. यावेळी आ.पाटील यांनी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून शेती व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित भुसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावून लवकरात लवकर त्यांना मोबदला द्यावा अशा सूचना दिल्या आहेत.आ.शहाजीबापू पाटील यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कवठेमंकाळ नागज आरेवाडीकडे सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु हद्दीतून जाणाऱ्या कालव्यास शनिवारी मध्यरात्री अचानक मध्यभागी भगदाड पडल्याने मोठ्या प्रवाहाने सुमारे १० तास पाणी वाहून शेतीचे बांध, ताली फुटून शेतातील बाजरी मका सूर्यफूल ऊस आदी उभी पिके डाळिंब फळबागेतून वाहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.पाण्याच्या प्रवाहामुळे शेत जमिनी वाहून गेल्यामुळे काही तासातच या परिसरात होत्याच नव्हते झाले, अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे अक्षरशः पाणीच पळाले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार शहाजी बापू पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

 

यावेळी त्यांच्यासमवेत प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी समाधान घुटुकडे, टेंभूचे उपअभियंता मनोज कर्नाळे, कालवा निरीक्षक मल्लिकार्जुन अंदानी ,शाखा अभियंता महेश पाटील , अक्षय खराडे, राजेश घाडगे, तलाठी वाघमोडे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आ.पाटील यांच्या समोर यंदाच्या वर्षी पावसा नसल्यामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे तर रब्बी हंगाम पूर्व पाऊस पडल्याने शेती व फळ पिकांना बऱ्यापैकी जीवदान मिळाले होते मात्र टेंभूचा कालवा फुटल्याने शेत शिवारातील ऊस ज्वारी मका डाळिंब पाण्याखाली गेल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगताना शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. यावेळी आमदार पाटील यांनी काळजी करू नका, तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असा विश्वास देवून शेतकऱ्यांना धीर दिला.

 

टेंभूच्या अधीक्षक अभियंत्यांनी आमदार पाटील यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद !

टेंभूच्या कालवा निर्मितीसाठी भूसंपादन झालेल्या शेतजमिनीचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही परंतु अधिकारी सांगतात की, सर्व बाबीची पूर्तता झाली असून केवळ संपादीत क्षेत्र खरेदी करून घेण्याचे काम बाकी आहे. ते काही असो आपण स्वतः लक्ष घालून भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत अश्या सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी टेंभूचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना केल्या आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!