शेकापक्षाकडून अखेर पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा

सांगोला(प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे सर्वेसर्वो, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी सांगोला विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे काम करणार असल्याचे मला स्पष्टपणे सांगितले आहे.त्यामुळे शेकापच्यावतीने व सांगोल्यातील जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानतो. शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासीक क्षण असून शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा हा सांगोला तालुका आहे. कष्टकरी, गरीब, वंचित माणूस जोपर्यंत लालबावट्यासोबत आहे तोपर्यंत या तालुक्यातून लालबावटा कोणीही उतरू शकत नाही असे सांगून त्यांनी सांगोला विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शेकापक्षाकडून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा केली. डॉ.अनिकेत देशमुख यांनी पक्षासाठी मोठा त्याग केला असून त्यांनी पक्ष कधीही वार्यावर सोडणार नसल्याचे भाई जयंत पाटील यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा भव्य मेळावा काल सांगोला येथे संपन्न झाला. या शेतकरी मेळाव्या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर रतनबाई गणपतराव देशमुख, शोभाताई पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.निकिता देशमुख, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, चिटणीस दादाशेठ बाबर, माजी चिटणीस प्रा.विठ्ठलराव शिंदे सर यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना भाई जयंत पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्याच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या दृष्टीने सांगोल्यात चांगले वातावरण असून बाईसाहेबांसाठी आजचा हा मोठा सण आहे. स्वतःचे आयुष्य जनतेसाठी अर्पण करणारा व्यक्ती डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने आज आपण जनतेसमोर आणत आहोत. डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख हे दोघेही गणपतराव देशमुख यांची परंपरा यशस्वीपणे चालवतील यात कोणतीही शंका नाही. डॉ. बाबासाहेब आणि डॉ.अनिकेत हे दोघे विद्वान असून पक्षाबद्दलची आत्मीयता ते कधीही विसरणार नाहीत. देशमुख कुटुंबामध्ये विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची जबाबदारी माझी व पदाधिकार्यांची होती ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. आता यापुढील जबाबदारी जनतेची असून विजयासाठी सर्वजण रात्रीचा दिवस करतील अशी अपेक्षा व्यक्त करत शेकापचे सर्व तरुण उमेदवार विधीमंडळात जाणार असून सध्याचे मंत्रिमंडळ हे आजपर्यंतच्या काळातील सर्वात वाईट सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची वाट लावली असून महाविकास आघाडी भक्कम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विधानसभेचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सत्तेसाठी महाराष्ट्रात विचार, निष्टा, तत्वे सोडली जात आहेत. मात्र पक्षाच्या संकटाच्या काळात देखील शेतकरी कामगार पक्षाचा कोणताही कार्यकर्ता जागचा हलला नाही हेच आबासाहेबांच्या निष्ठेचे उदाहरण आहे. निवडणूक तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लागो काही फरक पडणार नाही, नुसत्या डरकाळ्या फोडू नका… मैदानात या आणि कुस्ती धरा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे आबासाहेबांनी जातीपातीला कधीही थारा दिला नाही त्याच पद्धतीने मी आणि अनिकेत काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन उमेदवारी जाहीर केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, आजच्या गर्दीने माझे मन भरून आले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सांगोला तालुक्याचा दृष्टीने आजचा मेळावा हा ऐतिहासिक क्षण असून सांगोल्याचे राजकारण लोकप्रतिनिधींनी ढवळले आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचे गणित मांडून लोकशाहीला कलंक लावला जात आहे. विरोधकांकडून आम्हा भावंडात मतभेद पसरविण्यासाठी नेहमी प्रयत्न करण्यात आले, आमिषे दाखवण्यात आली पण आबासाहेबांची साठ वर्षाची पुंजी आमच्या सोबत आहे ती सहज कशी सुटणार… आबासाहेबांचा साठ वर्षाचा इतिहास असताना ही मोळी सुटू देणार नाही असा विश्वास देत आपण सर्वांनी ताकतीने निवडणूक लढूया आणि जिंकूया. आम्हा दोघांस आज व्यासपीठावर पाहून तालुक्यातील दोघांना झोप येणार नाही. पक्षातील सर्वांनी आता गटतट विसरा, मी आणि बाबासाहेब एकच आहोत आणि एकच राहणार असल्याचे सांगत डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यानीं खंबीरपणे उभे रहावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक कुलकर्णी सर यांनी तर आभार अॅड.विशालदिप बाबर यांनी मानले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.