सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

 सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला,सांगोला येथील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच औंध, चाफळ, ठोसेघर-धबधबा, सज्जनगड, महाबळेश्वर व प्रतापगड या प्रेक्षणीय ठिकाणी भेट देत शैक्षणिक सहल पूर्ण केली. सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सुमारे 280 विद्यार्थी आणि 20 शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते. मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेसने हे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहलीची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून पालकांच्या सदिच्छांनी करण्यात आली. 
आल्हाददायक थंडी व उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याच्या भेंड्या खेळत विद्यार्थी दुपारच्या सुमारास औंध संस्थानात दाखल झाले. यावेळी श्री भवानी वस्तूसंग्रहालय व चित्रसंग्रहालय यातील प्राचीन युगातील विविध देशातील विविध धातू पासून तयार केलेल्या वस्तू व चित्रे यांचा पंतप्रतिनिधी सरकारांनी केलेला संग्रह पाहून विद्यार्थी चकीत झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी श्री यमाई देवीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या श्रीक्षेत्र चाफळ येथील राम मंदिरात दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी भोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या भेट झालेल्या स्थळाचे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले आणि गाड्या ठोसेघर धबधब्याकडे रवाना झाल्या.
 सह्याद्रीच्या कुशीतून खळखळत वाहणारे धबधब्याचे पाणी पाहून विद्यार्थ्यांनी मनसोक्त फोटोग्राफी केली. त्यानंतर पेरू, स्वीट कॉर्न, कैरी यासारख्या रानमेव्याचे माकडांपासून रक्षण करत विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. तदनंतर सर्व विद्यार्थी श्री समर्थ रामदास स्वामींच्या 1676 ते 1682 दरम्यान वास्तव्य व समाधी स्थान असणाऱ्या पवित्र सज्जनगडावर जाऊन विद्यार्थ्यांनी श्री समर्थ रामदासांचे दर्शन घेतले. नंतर सर्व विद्यार्थी पहिल्या मुक्कामासाठी सातारा मार्गे महाबळेश्वरकडे रवाना झाले.
 रुचकर भोजन व उत्तम निवास व्यवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवसाचा प्रवासाचा शिन कुठल्या कुठे निघून गेला आणि विद्यार्थी पहाटे साडेपाच वाजता सूर्योदय पाहण्याकरिता सनराइज् पॉईंट कडे जाण्यास तयार झाले. योग्य वेळेत सूर्यदर्शन व फोटोसेशन झाल्याने आनंदी व उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी परत येऊन नाष्टा-चहा घेतला व त्यानंतर महाबळेश्वर मधील सुसाईड पॉईंट, मंकी पॉईंट, इको पॉइंट, एस्टर पॉईंट, धोका पॉइंट या प्रेक्षणीय स्थळांना तसेच पुरातन महाबळेश्वर मंदिर, कृष्णा-कोयना-गायत्री-भागीरथी-वेंना-सावित्री-सरस्वती या नद्यांच्या उगमस्थानी असणारे पंचगंगा मंदिर, कृष्णाई मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांना भेटी देत गाईड मार्फत तिथला इतिहास जाणून घेतला व दुपारी जेवणानंतर विद्यार्थी जल्लोषात प्रतापगडाकडे रवाना झाले.
 छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत प्रतापगड चढताना विद्यार्थ्यांचा उत्साह वाखानण्याजोगा होता. प्रतापगडावरील सर्व बुरुज व तेथील मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन विद्यार्थी मोठ्या आनंदात पुन्हा महाबळेश्वरकडे परतले. महाबळेश्वर येथे रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व गाड्या गुरुवारच्या पहाटे सुरक्षितपणे विद्यामंदिर प्रशालेच्या आवारात दाखल झाल्या.
 मोठ्या उत्साहात सहल झाल्याने आनंदी विद्यार्थी व समाधानी शिक्षक यांच्या सहकार्याने ही सहल यशस्वी झाली. यासाठी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके यांच्या सदिच्छांसह मुख्याध्यापक गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांचे मार्गदर्शन लाभले.
 सहलीमध्ये पर्यवेक्षक पोपट केदार, विभाग प्रमुख दादासाहेब वाघमोडे, डि.के.पाटील, वैभव कोठावळे, सचिन बुंजकर, आशुतोष नष्टे, महेश ढोले, वसंत गुळमिरे, डी.एस.पाटील, सिताराम राऊत, शुभांगी राजमाने,आश्विनी कुरणे, परी मुलाणी, विद्या जाधव, मुलाणी, रूपाली सरगर, रोहिणी शिंदे, रूपाली देशमुख, सुवर्णा कांबळे, धनश्री ढोले हे शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!