सांगोला तालुका

निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात; महूद(ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव

महूद, ता. ३१ : देशातील सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अशी मागणी करणारा ठराव महूद(ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला आहे.
महूद ग्रामपंचायत ग्रामसभा आज येथील सभागृहामध्ये घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी लुबाळ होत्या.मतदान प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या ईव्हीएम मशीन बाबत देशभरामध्ये सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे देशातील सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेवरती घेण्यात याव्यात अशी मागणी करणारा ठराव दीपक धोकटे यांनी मांडला.तर माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव सरतापे यांनी अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये मतदान मतपत्रिकेद्वारे घेतले जात असताना भारतातच ईव्हीएमचा आग्रह का धरला जात आहे असे मत व्यक्त करत मतपत्रिकेचा आग्रह करणाऱ्या मागणीला अनुमोदन दिले.
येथील मुख्य चौकात जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात यावी. शिवाय येथील मुख्य चौकात रस्त्यावर बसणारे व्यावसायिक व फळ विक्रेते यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा या विक्रेत्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे.याबाबत सांगोला पोलिसांशी पत्रकार करावा असा ठराव करण्यात आला. येथील मुख्य चौकालगत असणारे मटन-मच्छी विक्रेते त्यांच्याकडील सर्व घाण गावापासून जवळ असलेल्या ओढ्यात टाकत आहेत. त्यामुळे महूद-सांगोला रस्त्यावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. मटन व मच्छी विक्रेत्यांना यापूर्वी नोटीस देऊनही त्यांनी यामध्ये सुधारणा केली नाही.त्यासाठी घंटागाडीची सायंकाळी स्वतंत्र फेरी मारून यांच्याकडील कचरा गोळा करण्यात यावा व त्याचा खर्च त्यांच्यावर कडून वसूल करण्यात यावा असा ठराव करण्यात आला.
येथील मुख्य चौक विविध राजकीय पक्षांच्या पोस्टरबाजीमुळे सातत्याने गच्च भरलेला असतो. याबाबत काही नियम करून जाहिरात पोस्टर लावणाऱ्यांकडून पंचायतीने भाडे घ्यावे. प्राथमिक शाळेजवळ असलेल्या तालमीची दुरुस्ती करण्यात यावी. हॉटेल व्यवसायिक त्यांच्याकडील घाण पाणी हे मुख्य रस्त्यावर टाकत असल्यामुळे दुर्गंधी व अपघात वाढत आहेत.त्याला प्रतिबंध करण्यात यावा. या ग्रामसभेला सरपंच संजीवनी लुबाळ,उपसरपंच आशाबाई कांबळे,संजय पाटील, लिंगराज येडगे,शंकर पाटील,दौलत कांबळे,मोहन जाधव,मयूर मागाडे, दीपक धोकटे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
चौकट-१)  वाळू चोरांवर वचक हवा
येथील कासाळगंगा ओढ्याच्या पुनर्जीवन कामामुळे गावाला केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.या कामामुळे पाण्याचे स्रोत बळकट होत आहेत,मात्र या ओढ्यातील वाळू उपसा वाढला आहे.ओढ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणामुळे अचानक वाळू चोर मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.दिवस-रात्र या ओढ्यातील वाळू उपसा सुरू असून वाळू चोरी करणारी वाहने बेदरकारपणे सुसाट वेगाने मुख्य चौकातून गावातून धावत असतात.या वाळू चोरी करणाऱ्या वाहनांमुळे गावातील विद्यार्थी व नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तेव्हा याबाबत पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयास अर्ज देऊन याला अटकाव करण्याची मागणी करावी असा ठरावही यावेळी करण्यात आला.
चौकट-२) पोलिसांच्या अनास्थेमुळे चोऱ्यांमध्ये वाढ
येथील ग्रामसचिवालयामध्ये पोलीसांच्या कार्यालयासाठी एक खोली देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी पोलीस थांबत नसल्यामुळे गावात सातत्याने चोरांचे प्रमाण वाढते आहे.तेव्हा ग्राम सचिवालयातील ही खोली पोलिसांकडून काढून घ्यावी असाही ठराव करण्यात आला.
चौकट ३) ग्रामसभेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड अनास्था
ग्रामपंचायत मासिक सभा व ग्रामसभेत होणाऱ्या विविध ठरावांची अंमलबजावणीच केली जात नाही. त्यामुळे नागरिक या ग्रामसभांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत.- दिलीप नागणे,माजी उपसरपंच महूद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!