सांगोला तालुका

कॅन्सर ही देशापुढील राष्ट्रीय समस्या- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे

शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, सोनंद व प्रथम युवा भवन यांचे संयुक्त विद्यमाने “महिलांमधील कर्करोग: कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय” याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. हे व्याख्यान आम्रपाली बुद्ध विहार सोनंद, तालुका सांगोला येथे सायंकाळी 7.00 वाजता संपन्न झाले. सदर कार्यक्रमास बहुजन नेते माननीय बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर व सोनंद गावातील मान्यवर उपस्थित होते .

प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत.

कार्यक्रमा च्या सुरुवातीस प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख अनुप ठोकळे यांनी करून दिली. सदर व्याख्याना मध्ये डॉ. बनसोडे यांनी महिलांमधील स्तनांचा, गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्यासाठी संभाव्य कारणे विशद करत असताना त्यांनी जेनेटिक फॅक्टर्स त्याचप्रमाणे केमिकल फिजिकल व जैविक कार्सिनोजेन, ओनकोजेनिक विषाणू बाबत दैनंदिन जीवनातील अनेक सोपी उदाहरणे देत बहुमूल्य मार्गदर्शन केले.

 

सदर व्याख्यानात त्यांनी विविध कर्करोगांमधील लक्षणे जसे की भूक न लागणे वजन झपाट्याने कमी होणे, तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणे, अवयवांमध्ये जडपणा व शिथिलता जाणवणे, तोंडामध्ये लालसर पांढरे चट्टे येणे इत्यादी अनेक लक्षणांची विस्तृत माहिती दिली. कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब, निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, तंबाखू, धूम्रपान, दारू, गुटखा, खेनी, पान मसाला, मशेरी इत्यादीचे सेवन व तपकीर ओढणे यासारख्या व्यसनांना प्रतिबंध, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी याबाबत दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महत्त्व स्पष्ट केले. बापूसाहेब ठोकळे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना साठी उपलब्ध केलेल्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच नर्सिंग कोर्सच्या उपकरणांबाबत उपस्थितांना माहिती दिली.सदर कार्यक्रमाप्रसंगी विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
किशोर बनसोडे सर यांनी आपले मनोगत व आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन अनुप ठोकळे यांनी केले. सदर कार्यक्रमास सोनंद पंचक्रोशीतील महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!