बाळकृष्ण माऊली पुण्यतिथी सोहळ्याची गुरुवारपासून सुरुवात

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता प्रभात फेरीने होणार असून मंदिरातून प्रथमता प्रभात फेरी बाळकृष्ण माऊलींची समाधी,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर,अंबाबाई मंदिर, जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ,गिरीराज मंदिर या प्रमुख मार्गावरून निघणार आहे.
या प्रमुख मार्गावरील सर्व भाविक-भक्त आपल्या घरासमोर सडा-रांगोळी करून माऊलींच्या प्रभात फेरीचे स्वागत करुन पूजा करतात व या प्रभात फेरीमध्ये आरती घेऊन सहभागी होतात.
त्यानंतर सकाळी ठिक नऊ वाजता बाळकृष्ण भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर ठिक अकरा वाजता प्रवचन सेवा,किर्तन सेवा व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजनही या पुण्यतिथी सोहळ्यादरम्यान मंदिरामध्ये केले जाणार आहे.मंदिर व परिसरामध्ये मंडपाची सोय,भक्त निवासातील खोल्यामध्ये लाईट व पिण्याच्या पाण्याची सोय,अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय,भोजनगृहातील नियोजन त्याचबरोबर महत्त्वाचा घटक म्हणजे स्वच्छता व गर्दीमध्ये त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांग या सर्व गोष्टीचीं तयारी पुर्ण झाली आहे.