प्रा. डॉ. अशोकराव शिंदे यांनी विकसित केली “संजीवन कृषि चिकीत्सा प्रणाली” : कृषि क्षेत्रातील अभिनव संशोधन

आपण नेहमी फळे, भाज्या, अन्नधान्ये यांचा वापर आहारात खाण्यासाठी करतो, परंतु सध्या त्याची गुणवत्ता कमी होत आहे. रोग किडींना नियंत्रणात आणण्यासाठी रसायने पिकावर फवारली जातात. त्याचे उर्वरीत अंश, फळे, भाज्या व अन्नधान्यांमधुन येत आहेत. त्याचा परीणाम पशु-पक्षी व प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहे. माणवी आरोग्यावर याचा जास्त प्रभाव दिसत आहे. शिवाय माती व पाण्यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा -हास रसायनांमुळे होत आहे. डॉ अशोकराव शिंदे यांनी यावर उपाय म्हणुन “संजीवन कृषि चिकीत्सा प्रणाली” विकसित केली आहे.
या प्रणालीमधुन रसशोषक किडी. बुरशी, जिवाणू व विषाणू यांना कोणत्याही किटकनाशक व बुरशीनाशका शिवाय मारता येते. यामध्ये सेंद्रीय रसायने व उपयुक्त सुक्ष्मजीवांचा एकत्रित वापर करण्यात आलेला आहे. त्यांच्या एकत्रित मिश्रणामुळे “औषधी सिनर्जिकल प्रभाव” तयार करण्यात येऊन रोग व किडींच्या शरीरातील पाण्याचा अंश काढला जातो. रोग व किडीसाठी कारणीभुत सुक्ष्मजीवजंतू कोणत्याही विषारी औषधाशिवाय डिहायड्रेशन होऊन मारले जातात. पिकांवर रासायनीक औषधांमुळे येणारा ताण या प्रणालीमध्ये येत नाही. उलट टॉनीक मारल्याचा परीणाम मिळुन वनस्पतीची वाढ हिरवीगार व टवटवीत होते. हरीतलवके तयार होण्याचा वेग वाढतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली व जोमाने होते.
या प्रणालीमध्ये वापरण्यात येणारे उपयुक्त सुक्ष्मजीव सतत गॅस तयार करतात. हे गॅस त्यांची साठवणूक करताना बाहेर काढणे आवश्यक असते. त्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करण्याची गरज असते.
सेंद्रीय रसायने व उपयुक्त सुक्ष्मजीवांची साठवणूक स्थितीज उर्जेत केली
जाते. पिकांवर त्याचा वापर करताना प्रति एक लिटर पाण्यासाठी एक मिली याप्रमाणे करावा लागतो. शिवाय वापरताना त्यांना हलवुन स्थितीज उर्जेतून गतीज उर्जेत आणणे आवश्यक असते. फवारणी नंतर रसशोषक किडी बुरशी, जिवाणू व विषाणूंच्या शरीरातील पाणी काढुन (डिहायड्रेशन व्दारे) त्यांना मारुन नायनाट केला जातो.
वरील संकल्पनेतून कोणत्याही रासायनिक किटकनाशक व बुरशीनाशका शिवाय रोग व किडी नष्ट करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे रेसिड्यु फ्री फळे व भाजीपाला उत्पादित करण्याचा मार्ग आता सोपा होणार आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखण्याची सर्वस्वी जबाबदारी मानवावर असुन विविध मार्गातून निसर्गाकडे येणारी रसायने थांबविणे आवश्यक आहे. त्यातच आहारातुन प्रत्यक्ष मानवी शरीरात जाणा-या रसायनांच्या उर्वरीत अशांमुळे मानवी आरोग्य संपूर्णतः ढासळले आहे. विविध रोगांचा मानवी शरीरामध्ये प्रवेश होतो. मानवाची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. म्हणुन आपण सर्वानी आता विषमुक्त शेतीचा पुरस्कार करणे काळाची गरज आहे.
सध्या प्रचलीत शेतीवर खर्च जास्त होत आहे. रासायनिक खते व औषधांचा दुष्परीणामांची जाणीव झाल्यामुळे शेतकरी या पद्धतीपासुन दुर जातोय. याऊलट संजीवन कृषि चिकीत्सा प्रणालीव्दारे कमी खर्चात विषमुक्त फळे, भाज्या व अन्नधान्ये पिकविण्याचा मार्ग सुखकर होण्यास मदत होणार आहे. “संजीवन कृषि चिकीत्सा प्रणाली” मधील नवीन संकल्पनेनुसार कोणत्याही रासायनिक विषारी औषधाशिवाय रोग व किडींना नष्ट करता येते.. त्यामुळे आहारातील उर्वरीत अंशाचे परीणाम कमी करुण मानवी आरोग्य व पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने प्रा.डॉ.अशोकराव शिंदे यांचे हे संशोषन हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. सन २००७ पासुन ते या प्रणालीवर काम करीत असुन, तब्बल १६ वर्षांनी त्यांच्या या कार्याला यश मिळालेले आहे. सदर बाबतच्या चाचण्या त्यांनी द्राक्षे, डाळींब, भाजीपाला पिके व स्ट्रॉबेरीवर घेतलेल्या आहेत.
प्रा. डॉ. अशोकराव शिंदे आपल्या परिसरातील शेतीच्या विविध प्रश्नावर काम करीत आहेत. महाराष्ट्र शासनाबरोबर त्यांनी अनेक प्रकल्पावर रिसोर्स पर्सन म्हणुन काम केलेले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक शेती परसंवादात ते सहभागी झालेले आहेत. माण खो-यातील माती व पिकरचनेच्या अभ्यासासाठी त्यांनी माण नदी काठी १६५ किमी पायी अभ्यास दौरा केलेला आहे. सातत्याने ते विद्यार्थी व शेतक-यांमध्ये सेंद्रीय व विषमुक्त
शेतीची जागृती करीत आहेत. शिवाय ते गेली २५ वर्षे न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे कृषि अध्यापनाचे कार्य करीत आहेत.त्यांचे कृषिविषयक सहा शोधनिबंध प्रकाशीत असुन विद्यार्थ्यांसाठी चार कृषिविषयक पुस्तकांचे लिखाण केलेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सामाजिक संस्था व महाराष्ट्र शासनाने त्यांना विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. संजीवन कृषि चिकित्सा प्रणालीव्दारे मांडण्यात आलेल्या या नाविण्यपूर्ण संकल्पनेची समाजातील व पर्यावरणातील प्रत्येक घटकाला गरज असुन, त्यांच्या अभिनव संशोधनाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.