चेतनसिंह केदार-सावंत यांचं मराठा समाजासाठी योगदान काय?

स्वतःच्या प्रसिध्दीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टिका करण्याचा भाजपा जिल्हाध्यक्षांचा केविलवाणा प्रयत्न
सांगोला/प्रतिनिधीः
मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाने स्विकारले असुन त्यांनी समाजासाठी स्वतःच्या जिवाची बाजी लावली आहे व घरावर तुळशीपत्र ठेवुन ते समाजाला आपले मायबाप समजुन काम करत आहेत, असे असताना भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करणे म्हणजे स्वतःच्या प्रसिध्दीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अखंड महाराष्ट्रात रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी लाखो मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते पण सन्माननिय जिल्हाध्यक्षांनी यावेळी तोंडातुन ब्र शब्द पण काढला नाही परंतु त्यांचे श्रध्देय यांच्यावर झालेली टिका त्यांना सहन न झाल्याने त्यांनी हे व्यक्तव्य केले असल्याचे वाटते असे व्यक्तव्य स्वराज्य पक्षाचे तालुकाप्रमुख विशाल केदार यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या 7 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यात शांतता रॅलीच्या माध्यमातुन आगमन होणार आहे. त्यांचा हा दौरा भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे त्यामुळे त्यांनी हे विधान केले असावे.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचा अजेंडा जरुर राबवावा, त्यांनी त्यांच्या पक्षासाठी जिवाचं रान करुन पक्षासाठी काम कराव परंतु मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत असणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करु नये अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या विधानसभेत भाजपा पक्षाला भोगावे लागतील असे स्वराज्य पक्षाचे तालुकाप्रमुख विशाल केदार यांनी सागितले.