मिसाळ पाचेगावात सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी

पाचेगांव/प्रशांत मिसाळ:
मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय तालुक्यातील पाचेगांव खुर्द येथील सकल मराठा समाज व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला. मराठा समाजाच्या या निर्णयाला गावातील संपूर्ण ओबीसी समाजाने मोठ्या ताकदीने पाठिंबा दिला आहे.
सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. अशातच “दुष्काळ बापाला जगू देत नाही अन आरक्षण पोरांना शिकू देत नाही” अशी परिस्थिती सध्या मराठा समाजाचे झाली असल्याची चर्चा समाज बांधवांमधून होत आहे. सोलापूर मराठा क्रांती मोर्च्यामध्ये पाचेगांव खुर्द मधील बांधव मोठ्या संख्येने सामील झालेले होते. तेव्हा पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चामध्ये व आंदोलनामध्ये पाचेगांव खुर्द गांव संपूर्ण ताकदीने सोबत असल्याचे समाज बांधवांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावरून गावागावातील सर्वसामान्य मराठा आणि ओबीसी समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे चित्र दिसून येत असून मराठा नेत्यांची विश्वासहर्ता संपत चालली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीमागे करोडोंचा समाज उभा राहिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व आरक्षण लढ्याला साथ देण्यासाठी पाचेगांव खुर्द ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन सर्वानुमते एक ठराव मंजूर करण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी यांना गावात प्रवेश करण्यास बंदी असणार असल्याची माहिती ग्रामपंचायत पाचेगांव खुर्द यांच्याकडून प्राप्त झाली. यावेळी पाचेगांव खुर्द गावातील ग्रामस्थ, मराठा समाज व ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या सगळीकडेच सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचे राजकीय कार्यक्रम, सभा उधळून लावण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे सरकारने 24 तारखेला जरांगे पाटील यांची ओबीसी मधून सरसकट कुणबी मराठा आरक्षणाची मागणी मान्य नाही केली तर राजकीय नेत्यांना राज्यात, मतदारसंघातच काय त्यांना घराबाहेर देखील फिरणे मुश्किल करू.
– संगीता संजय भोसले, बिनविरोध सरपंच पाचेगांव खुर्द